बीडीडी चाळीतील पुनर्वसनाची घरे विक्रीच्या घरांसारखीच दर्जेदार हवीत, शिंदेंचे आदेश
बीडीडी चाळ पुनर्विकास ठरलेल्या वेळेत आणि चांगल्या दर्जाने पूर्ण करा, घरांच्या दर्जात किंवा सुविधांत तडजोड नको, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम ठरलेल्या वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करा, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या सदनिकांचा दर्जा आणि रहिवाशांना द्यायच्या सुविधा यांच्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विक्रीसाठी बांधल्या जाणाऱ्या घरांसारखीच पुनर्वसनाची घरेही दर्जेदार आणि सर्व सुविधांनी युक्त असली पाहिजेत, असेही शिंदे यांनी सांगितले.
समूह पुनर्विकासातून रहिवाशांना फक्त हक्काचे घर मिळणार नाही, तर सर्व सोयींनी युक्त परिसरही मिळणार आहे, असे शिंदे म्हणाले. मोकळ्या जागा, उद्याने, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळाची मैदाने अशा एकूण 23 प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ पुनर्विकास आंदोलनादरम्यान तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. ते मागे घेण्यासाठी राज्य शासन कार्यवाही करेल, असे शिंदे यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या विकासधोरणाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे म्हाडा आणि इतर शासकीय यंत्रणांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करून लोकांचा विश्वास आणखी पक्का करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आवश्यक बदल करण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडाचे प्रकल्प पुढे सरकले आहेत. याआधी अनेक पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे अडकून पडले होते. अशा प्रकल्पांसाठी शासन सक्रिय भूमिका घेत असून, लोकांना हक्काच्या घरासोबत थकलेले भाडेही मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
मुंबईकरांना जास्त मोकळ्या जागा आणि चांगल्या सार्वजनिक सुविधा मिळाव्यात म्हणून रेसकोर्सची 125 एकर आणि कोस्टल रोडलगतची सुमारे 150 एकर जागा, अशा जवळपास 300 एकरांवर जागतिक दर्जाचे खुले उद्यान उभारण्याचे नियोजन आहे. नागरी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि मोकळ्या जागा यांचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यावर शासनाचा भर आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या तोंडावर बीडीडी चाळीतील 557 कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरात जाता येणार आहे, हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. हा दिवस या कुटुंबांच्या आयुष्यभर लक्षात राहील, असे त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी बीडीडी चाळीत झालेल्या चावी वाटप कार्यक्रमाची आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवणही त्यांनी काढली.
मुंबईच्या विकासात हातभार लावणारे कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या राहणीमानाचा विचार करणे गरजेचे आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. नव्या घरात जाणाऱ्या कुटुंबांनी मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः मुलींचे शिक्षण यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बीडीडी चाळींना मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींचा मोठा इतिहास आहे. वेगवेगळ्या भाषा, प्रांत आणि संस्कृतीतील लोक तिथे एकत्र राहिले आणि त्यांनी सामाजिक एकोपा जपला. नव्या इमारतींतही चाळीतला जिव्हाळा, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आणि सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा टिकवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. हा म्हाडाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला असून, त्यामुळे म्हाडाच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर झाल्या, असे ते म्हणाले. या प्रकल्पाचा अनुभव कामाठीपुरा आणि उमरखाडी पुनर्विकासालाही उपयोगी पडेल, असेही त्यांनी सांगितले.
वरळी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा आणि रस्त्यांवर ताण येत आहे, त्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांना गती द्यावी लागेल, असे अहिर यांनी सांगितले. फेमस स्टुडिओ परिसरातून ना. म. जोशी मार्गाला जोडणारा उड्डाणपूल झाला, तर वरळीकरांना सात रस्ता आणि आर्थर रोड नाक्याला वळसा घालावा लागणार नाही. या प्रस्तावासाठी मुंबई महापालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. वरळीच्या आतल्या भागातील पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मंत्री ॲड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील शिंदे, आमदार मनिषा कायंदे, शायना एनसी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.