अविनाश नारकरांच्या भावनिक व्हिडिओमागचं सत्य उघड, 'जनक' चित्रपटाचं प्रमोशन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डोळ्यांत अश्रू आणून बोलणारा ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांचा व्हिडिओ खरा अनुभव नसून, 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'जनक' चित्रपटातील पात्राचा अभिनय होता.
ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. नेटकऱ्यांमध्येही चिंता वाढल्याचं दिसलं. पण काही क्षणातच नारकर यांनी त्यामागचं खरं सत्य सांगितलं आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
व्हिडिओच्या सुरुवातीला नारकर डोळ्यांत अश्रू आणून बोलताना दिसतात. ते म्हणतात, "नमस्कार, मी जोशी मास्तर... लेकीला दिवस गेले म्हणून उत्साहाने पुण्याला निघालो होतो, पण प्रवासातील एका छोट्याशा व्हिडिओमुळे माझी कमावलेली सगळी अब्रू अक्षरशः धुळीला मिळाली." हे सगळं ते रडता रडता सांगत आहेत, आणि त्यामुळेच नेटकऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचं दिसलं.
त्यानंतर लगेचच, रडता रडता, ते हसतमुखाने आपली भूमिका स्पष्ट करतात. त्यामागे त्यांचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता, तर तो आगामी चित्रपटातील पात्राचा अभिनय होता. "हे होतं रिल, आता रिअल सांगतो... सोशल मीडियाच्या रिलमध्ये जे काही दिसत असतं ते सगळं रिअल नसतं," असं म्हणत नारकर यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली.
सत्य घटनेवर आधारित 'जनक' हा त्यांचा नवा चित्रपट येत्या 13 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हा व्हिडिओ चित्रपटाच्या प्रमोशनचाच भाग होता. त्यासाठी नारकर यांनी ही अनोखी आणि लक्षवेधी रणनीती वापरली होती.
या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे. 'जनक' मध्ये अभिनेत्री सायली संजीव, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आणि विनिता काळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडियावरील रिल्समधून नेहमी सक्रिय आणि उत्साही दिसणाऱ्या नारकर यांचा हा भावनिक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे 'जनक' बद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
टीझरमध्ये वडिलांवर झालेले आरोप, त्यांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी आणि सत्याच्या शोधातला न्यायालयीन संघर्ष दिसतो. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. न्यायाचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केलं आहे. आर टी बी फिल्म्स प्रस्तुत 'जनक' हा कोर्टरूम थ्रिलर 13 नोव्हेंबर 2026 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.