शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७व्या वर्षी मुंबईत निधन

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७व्या वर्षी मुंबईत निधन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

'कांटे' आणि 'काबिल'चे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. या बातमीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील राहत्या घरी बाथरूममध्ये पडल्याने संजय गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर संजय गुप्ता यांचा फोटो शेअर करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये पंडित यांनी संजय गुप्ता यांचा उल्लेख जवळचा मित्र आणि उत्कृष्ट दिग्दर्शक असा केला. संजय गुप्ता हे नेहमी उत्साही असणारे, उत्तम कथा सांगणारे आणि चित्रपट निर्मितीची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. संजय गुप्ता यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावनाही अशोक पंडित यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून तपास सुरू केला आहे.

संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये 'आतिश : फील द फायर' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी 'राम शास्त्र', 'हमेशा', 'जंग' आणि 'खौफ' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेला 'कांटे' हा त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि लकी अली यांसारखे कलाकार दिसले होते. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली.

संजय गुप्ता आणि अभिनेता संजय दत्त यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष लोकप्रिय होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'मुसाफिर', 'जिंदा' आणि 'शूटआउट अॅट लोखंडवाला' यांसारख्या चित्रपटांमुळे ही जोडी चर्चेत राहिली. याशिवाय संजय गुप्ता यांनी 'शूटआउट अॅट वडाळा', 'जज्बा', 'काबिल' आणि 'मुंबई सागा' यांचेही दिग्दर्शन केले. त्यातही हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेला 'काबिल' प्रेक्षकांना विशेष आवडला.

संजय गुप्ता यांनी फक्त दिग्दर्शक म्हणूनच नाही, तर निर्माते आणि पटकथालेखक म्हणूनही चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. 'दस कहानियां', 'प्लान', 'वुडस्टॉक व्हिला', 'अॅसिड फॅक्टरी' आणि 'पंख' या चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते. अॅक्शन, गुन्हेगारी विश्व आणि थरारक कथानकांची मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची खास ओळख होती. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने वेगळ्या शैलीचा एक दिग्दर्शक गमावला, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ