अर्जुनी/मोरगावात ई-कचऱ्याबाबत जनजागृती रॅली, कॉलेज आणि नगरपंचायत एकत्र
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय आणि नगरपंचायत यांनी ई-कचरा जनजागृती, संकलन व व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम आणि रॅली काढली.
अर्जुनी/मोरगाव येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ई-कचरा जनजागृती, संकलन व व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम आणि रॅली झाली. शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथील भौतिकशास्त्र विभाग आणि नगरपंचायत, अर्जुनी/मोरगाव यांनी मिळून हा उपक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे सहसचिव मयंक जायस्वाल होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. भारत राठोड, IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कापगते, कार्यक्रम समन्वयक आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. एल. चौधरी, ग्रंथपाल प्रा. अजय राऊत आणि प्रा. पंकज उके प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. नगरपंचायतीचे कर्मचारी दिलीप उके, निखिल बंड, शुभम गोरकार, श्रीमती योगेश्वरी मेश्राम, सौ. दीप्ती भाजीपाले, दुर्योधन नेवारे, सौ. शिल्पा सांडेकर, दीपक डोंगरवार, दीपक राऊत, नयनकुमार सहारे, अनुज जांभुळकर, सुरेश बोरीकर, महेश राऊत, कु. अश्विनी सहारे आणि कु. तेजस्वी निमजे यांचीही उपस्थिती होती. कॉलेजचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही आले होते.
सुरुवातीला डॉ. डी. एल. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ई-कचरा किती वाढतोय, त्याचा पर्यावरणावर आणि माणसाच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो, हे त्यांनी सांगितले. ई-कचरा नीट गोळा करणे, त्याचा पुन्हा वापर करणे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करणे का महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी समजावले. Reduce, Reuse आणि Recycle ही त्रिसूत्री अंगीकारा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भारत राठोड यांनी मनोगतात सांगितले की, पर्यावरण टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा. अध्यक्षीय भाषणात मयंकजी जायस्वाल म्हणाले की, अशा जनजागृतीच्या उपक्रमांतून समाजात पर्यावरणाबद्दलच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. कॉलेज आणि नगरपंचायत यांनी मिळून केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.
नगरपंचायत कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथील मुख्याधिकारी श्री ज्ञानेश सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून गेले दोन दिवस घंटागाडीमार्फत ई-कचरा गोळा करण्याचे आणि कॉलेजच्या रॅलीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे संयुक्त रॅलीत ई-कचरा संकलनाला मदत झाली.
महाविद्यालयाच्या परिसरातून निघालेली रॅली मुख्य बसस्थानक, सिव्हिल लाईन परिसर आणि मुख्य बाजारपेठ या मार्गाने गेली. वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा गोळा करून रॅली पुन्हा कॉलेजमध्ये परतली. रॅलीतून नागरिकांना ई-कचरा नीट गोळा करणे, त्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली. ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास याबाबत समाजाला महत्त्वाचा संदेश देण्यात आला. घरातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर कचऱ्यात न टाकता वेगळ्या गोळा करून अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्राकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अजय राऊत, प्रा. पंकज उके, डॉ. आशिष कावळे, डॉ. नितीन विलायतकर, संदीप हातझाडे, अजिंक्य लाडे, कु. कृतिका नाकाडे, निर्भय बोरकर, कु. सलोनी लंजे, कु. स्नेहा, कु. शारदा गोटे, कु. रुपाली हटवार, कु. निशा रॉय, योगेश, कु. रेशमा, प्रफुल्ल, प्रवीण मसराम, बादल लाडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष मदत केली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.