सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

पावसाने ओढ दिल्याने अकोल्यात शेतकरी हवालदिल; खरीप कोरडा गेला, रब्बीवरही संकट

अकोला जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. आता रब्बीच्या पेरणीसाठी पाणी आणि भांडवल कसे उभे करायचे, या चिंतेत शेतकरी आहेत.

पावसाने ओढ दिल्याने अकोल्यात शेतकरी हवालदिल; खरीप कोरडा गेला, रब्बीवरही संकट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अकोला जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता रब्बी हंगामावरही संकट आले आहे. जिल्ह्यात सरासरी ६९३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता, पण प्रत्यक्षात फक्त ४२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसात दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कपाशी आणि इतर खरीप पिकांची वाढ नीट झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. रब्बीच्या पेरणीसाठी पाणी आणि भांडवल कसे उभे करायचे, ही चिंता त्यांना सतावत आहे.

जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जमिनीतील ओलावा घटल्याने रब्बीच्या पेरणीतही अडचणी येत आहेत. खरिपातून उत्पन्नाची आशा संपल्याने पुढच्या हंगामासाठी भांडवल उभे करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल, या अपेक्षेने शेतकरी शासनाकडे लक्ष लावून बसले होते. मात्र हजारो रुपयांचा उत्पादन खर्च आणि झालेले मोठे नुकसान पाहता ही मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी केलेला खर्च वसूल होण्याची शक्यताही कमी आहे. त्यातच रब्बीच्या पेरणीसाठी पुन्हा नव्याने खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना किती भरपाई मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरडवाहू शेतीला सर्वाधिक झळ बसली आहे. जिल्ह्यातील एकूण ४ लाख ३२ हजार १० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख २२ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील कोरडवाहू शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. या क्षेत्रातील ४ लाख ६ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. एकूण १ हजार ३७ गावांमधील २ लाख ८८ हजार ७६ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. तसेच बागायती क्षेत्रातील ६११ गावांमधील ६ हजार ६३१ शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे.

खरिपातील नुकसान सोसल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी पाणी आणि आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुढच्या हंगामासाठी लागणारी मदत वेळेत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांसमोरचे आर्थिक संकट अधिक गडद होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ