लोहा : पावसाने दडी मारल्याने खरीप करपले, शेतकरी कर्जात आणि चारा-पाण्याची चिंता
उभी खरीप पिके पावसाअभावी करपली आहेत. शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी हा मोठा प्रश्न झाला आहे.
लोहा : यंदा पावसाअभावी खरीप हंगामातील उभे पीकच करपून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व आर्थिक संकट उभे राहिले आहे. पेरणी, खते, औषध फवारणी आणि मशागत यावर शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले होते. पण शेवटी हाती मोठी निराशाच आली.
महाराष्ट्राने १९७२ मध्ये भीषण कोरडा दुष्काळ अनुभवला होता. त्या काळातील जाणकारांच्या आठवणीनुसार पोळ्यानंतर पाऊस पडल्याने काही भागांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र २०२६ मधील कोरड्या दुष्काळाची तीव्रता वेगळीच आहे.
२०२५ मध्ये अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असतानाच अनेकांनी उसनवारी केली, व्याजाने कर्ज घेतले आणि खासगी सावकारांकडून पैसे घेऊन जून महिन्यात पुन्हा खरिपाची पेरणी केली. यंदा सुरुवातीला पाऊस झाला. पण त्यानंतर पावसाने मोठा खंड दिला. त्याचा फटका सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांना बसला. अनेक ठिकाणी पिके अक्षरशः करपली आहेत आणि उत्पादनाची आशाच संपली आहे.
गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने हातातोंडाशी आलेले पीक नेले. यंदा कोरड्या दुष्काळाने उभ्या पिकांवरच घाला घातला. कर्जाचा डोंगर वाढत आहे, उत्पादन खर्चही निघत नाही आणि पुढच्या हंगामासाठी भांडवल नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवरचा आर्थिक आणि मानसिक ताण वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रभावी मदतकार्य हाती घ्यावे, अशी गरज व्यक्त होत आहे. केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, कर्जाबाबत दिलासा आणि पुढच्या हंगामासाठी आवश्यक आधार मिळायला हवा.
पिकांच्या नुकसानानंतर आता सर्वात मोठे आव्हान जनावरांचा चारा आणि पाणी हे आहे. शेतात चारा नाही, मग जनावरे जगवायची कशी, चारा कुठून आणायचा आणि पिण्याच्या पाण्याची सोय कशी करायची, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. मराठवाड्यातील अनेक धरणे आणि तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणात सध्या सुमारे ३६ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले जाते. लोह्यासह आसपासच्या अनेक गावांचे पिण्याचे पाणी याच धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
काही तलावांत अजून थोडाफार पाणीसाठा आहे. पण त्या पाण्याचा मोटारींनी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. शेतीसाठी पाणी बेसुमार उपसले गेले, तर पुढे पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचीही टंचाई होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन महिन्यांचे पाणी जनावरांच्या पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
लोहा शहराला लिंबोटी धरणावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना सुरू आहे. ती लवकरात लवकर कार्यान्वित करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. लोहा शहरात सुमारे १० हजार मालमत्ताधारक आहेत, तर अधिकृत नळजोडण्या सुमारे १,८०० आहेत. उरलेल्या अनेक कुटुंबांचे पाणी घरच्या बोअरवेलवर अवलंबून आहे. सुनेगाव तलावात सध्या दोन ते तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे, असेही मुख्याधिकारी भोळे यांनी सांगितले.