कॉलेजमधील २२ टक्के विद्यार्थ्यांनी सुरू केला व्यवसाय, ४३ टक्क्यांना भविष्यात उद्योजक व्हायचंय
आयआयटी मंडीच्या GUESSS India 2025 अहवालातून भारतीय विद्यार्थ्यांचा कल नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायाकडे वाढत असल्याचे दिसते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतातील कॉलेज कॅम्पस आता फक्त डिग्री मिळवणे आणि नोकरीची तयारी करणे इतक्यापुरते उरलेले नाहीत. स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा तरुणांमध्ये झपाट्याने वाढते आहे. आयआयटी मंडीच्या 'GUESSS India 2025 नॅशनल सर्व्हे रिपोर्ट'मधून हे समोर आले आहे.
या सर्वेक्षणात ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १२०० हून अधिक उच्च शिक्षण संस्थांच्या २५,७८३ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते. त्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांनी आधीच कोणता ना कोणता व्यवसाय सुरू केला आहे. ग्लोबल ॲव्हरेज २३ टक्के आहे, म्हणजे भारताचा आकडा त्याच्या अगदी जवळ आहे.
अहवालानुसार ४३ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. म्हणजेच कॉलेजमध्ये शिकणारा मोठा वर्ग आता नोकरीलाच करिअरचा एकमेव मार्ग मानत नाही. शिक्षण संपताच लगेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २०२३ मध्ये १४ टक्के होते, ते २०२५ मध्ये १६.२ टक्के झाले आहे. सरकारी नोकरी आणि मोठ्या कंपन्यांत काम करण्याची इच्छा मात्र कमी झाल्याचे दिसते.
विद्यार्थ्यांची आवड फक्त विचारांपुरती नाही. विद्यार्थी उद्योजकांपैकी ३५.५ टक्क्यांनी सांगितले की त्यांच्या व्यवसायाची नियमित विक्री होते. जागतिक स्तरावर हा आकडा ३३ टक्के आहे. म्हणजे काही विद्यार्थी कॉलेजच्या काळातच आपल्या आयडियाला खरा व्यवसाय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
४१ टक्के विद्यार्थी उद्योजकांनी आधी एखादा व्यवसाय बंद केल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. यावरून तरुण उद्योजक अपयशाला शेवट मानत नाहीत, तर पुन्हा प्रयत्न करायला तयार असतात, असे दिसते. जवळपास ४२ टक्के विद्यार्थी उद्योजक एकापेक्षा जास्त व्यवसाय चालवत आहेत.
विद्यार्थी उद्योजकांमध्ये IT, AI आणि डिजिटल तंत्रज्ञान ही क्षेत्रे सर्वात आकर्षक ठरत आहेत. या क्षेत्रांत व्यवसाय करण्याची योजना आखणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे, पण सध्या सुरू असलेल्या विद्यार्थी व्यवसायांपैकी फक्त १० टक्के व्यवसाय डिजिटल श्रेणीत येतात. म्हणजे विद्यार्थ्यांकडे आयडिया आणि तांत्रिक आवड आहे, पण ती बाजारात उतरवण्यासाठी त्यांना चांगले मार्गदर्शन आणि संसाधने हवी आहेत.
आजूबाजूच्या उद्योजकांचा प्रभावही मोठा आहे. ज्या विद्यार्थ्याच्या परिवारात, मित्रांत, सहकाऱ्यांत किंवा शिक्षकांच्या नेटवर्कमध्ये एखादा उद्योजक आहे, त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता, उद्योजकाशी संपर्क नसलेल्या विद्यार्थ्याच्या तुलनेत तिप्पट असते. त्यामुळे कॉलेजमध्ये मेंटरशिप, यशस्वी फाऊंडर्सशी संवाद आणि इंडस्ट्री नेटवर्किंगची गरज स्पष्ट दिसते.
व्यवसायाबद्दल महिलाही पुरुषांच्या जवळपास बरोबरीने रस दाखवत आहेत, पण इच्छेचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करण्यात फरक दिसतो. उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांपैकी ४५ टक्क्यांनी प्रत्यक्षात व्यवसाय सुरू केला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ५३ टक्के होते. आर्थिक मदत, नेटवर्क, मेंटरशिप आणि कुटुंब किंवा संस्थेचा पाठिंबा यांची महिलांना बिझनेस आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका असते, असे या फरकावरून स्पष्ट होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.