सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 244 | Poor 13:39 IST

कात्रज-कोंढवा रोडवर १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न, मैत्रीण धावली म्हणून वाचली

सुखसागरनगर परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारानंतर मैत्रीण आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी जितु सरोज याला ताब्यात घेतले आहे.

कात्रज-कोंढवा रोडवर १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न, मैत्रीण धावली म्हणून वाचली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात बळजबरीने उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेळीच जमा झालेल्या नागरिकांच्या आणि मैत्रिणीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी धाडस दाखवत आरोपीला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जितु किशोरीलाल सरोज असे आहे. तो ३० वर्षांचा असून मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पीडित तरुणी सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. त्याच वेळी आरोपी तिथे आला, त्याने तरुणीची छेड काढली आणि तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देताना पीडित तरुणी म्हणाली, "मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा तो तिकडे आला, माझ्या शेजारून फिरला आणि मला डायरेक्ट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझी मैत्रीण तिकडे आली, तिने त्याला ढकललं, तेव्हा मी खाली पडले. पडल्यावर मला हाताला लागले. तरीही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे लोक जमा झाले, त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होता. तो अनोळखी होता, मी त्याला कधीही पाहिले नव्हते. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण वेळेत आली म्हणून वाचले, नाहीतर तो मला उचलून घेऊन गेला असता."

तरुणीच्या आरडाओरडीनंतर तिची मैत्रीण आणि आजूबाजूचे स्थानिक नागरिक लगेच मदतीला धावून आले. नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या गोंधळात आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी जितु सरोज याला तात्काळ ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ