बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांनीच रचला स्वतःवरील हल्ल्याचा कट, पोलिसांचा दावा
मंत्र्यांसारखी एस्कॉर्ट गाड्यांसह सुरक्षा मिळावी, यासाठी राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला घडवल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे बारामती शहरासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पण हा हल्ला खरा नव्हता, तर सूर्यवंशी यांनीच स्वतःवर जीवघेण्या हल्ल्याचा कट रचला होता, असा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
मंत्र्यांना आणि अतिमहत्त्वाच्या म्हणजेच VIP व्यक्तींना जसे पोलीस संरक्षण मिळते, तशी एस्कॉर्ट गाड्यांसह हाय-प्रोफाइल सुरक्षा आपल्यालाही मिळावी, या हव्यासापोटी त्यांनी हे केले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक केली. आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण कटाचा उलगडा झाला. बारामती पोलिसांच्या या कामगिरीची आता सगळीकडे चर्चा सुरू आहे.
हल्ला कसा झाला होता, ते आधी पाहू. 'राणा शिपिंग'चे मालक असलेले राणा सूर्यवंशी 18 ऑक्टोबर रोजी वैयक्तिक कामासाठी बारामतीत आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा खासगी बॉडीगार्डही होता. संध्याकाळी साडेसात वाजता बारामती एअरपोर्टजवळ, गोजुबावी शिवारात, स्कूटीवरून दोघे जण आले. 'आम्ही तुमचे फॅन आहोत' असे सांगून त्यांनी सूर्यवंशी यांना बुके देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी शस्त्राने सूर्यवंशी यांच्या उजव्या हातावर वार केले. जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी यांनी याआधी पैसे भरून पोलीस संरक्षण घेतले होते. मात्र त्यांना फक्त पोलीस नको होते. मंत्र्यांसारखा गाड्यांचा ताफा आणि एस्कॉर्ट गाड्यांसह VIP दर्जाचे पोलीस संरक्षण त्यांना हवे होते. सरकारी नियमांनुसार अशा सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तीला किती धोका आहे, याचा विचार केला जातो. म्हणूनच आपल्याला धोका आहे असे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःवरच हल्ल्याचा कट रचला, असे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. ते 42 वर्षांचे असून सणसर (ता. इंदापूर) येथे राहतात. लक्ष्मीकांत हे राणा सूर्यवंशी यांचे ड्रायव्हर आहेत.
पोलिसांनी याआधी पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे या दोघांना अटक केली होती. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक झाल्याने या तपासाला आणखी वेग आला आहे. आता या बनावट हल्ल्याप्रकरणी पोलीस उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.