सुखसागरनगरमध्ये तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न, नागरिकांनी आरोपीला पोलिसांकडे सोपवले
कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात 18 वर्षांच्या तरुणीची छेड काढून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला. लोकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरच्या सुखसागरनगर परिसरात एका 18 वर्षांच्या तरुणीची छेड काढून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजूबाजूच्या लोकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीचे नाव जितु किशोरीलाल सरोज असून त्याचे वय 30 वर्षे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे आणि ते अतिशय धक्कादायक आहे. पुण्यासारख्या शहरात भर रस्त्यात, सर्वांच्या देखत एखाद्या मुलीला उचलून नेण्याची हिंमत कोणी कशी करू शकतो, असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यामुळे शहरातली गुन्हेगारी आणि बिघडत चाललेली कायदा-सुव्यवस्था हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट बघत उभी होती. त्याच वेळी आरोपीने तिच्या छातीला हात लावला, तिचा शर्ट ओढला आणि तिला उचलले, असा आरोप आहे. तरुणीने आरडाओरडा केल्यावर तिची मैत्रीण आणि जवळपासचे स्थानिक लोक मदतीला धावून आले. लोकांनी आरोपीला पकडून मारहाण केली.
या गोंधळात आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडला, असेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत. तपासातून आणि आरोपीच्या चौकशीतून कोणती माहिती बाहेर येते, हे आता बघावे लागेल.
पीडित तरुणीने स्वतः काय घडले ते सांगितले. ती म्हणाली, "मी शनिवारी घरातून निघाले आणि साडेसहाच्या सुमारास सुखसागर परिसरात समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट बघत थांबले होते. तेव्हा तो तिथे आला, माझ्या शेजारून फिरला आणि मला डायरेक्ट उचलून नेण्याचा प्रयत्न केला."
तरुणीने पुढे सांगितले, "तेवढ्यात माझी मैत्रीण तिथे आली. तिने त्याला ढकलले, तेव्हा मी खाली पडले. पडल्यावर मला हाताला लागले. तरीही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे लोक जमा झाले. त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होता."
"तो अनोळखी होता, मी त्याला कधीही पाहिलेले नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण आली म्हणून वाचले, नाहीतर तो मला उचलून घेऊन गेला असता," असे पीडित तरुणीने सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.