मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन; 4 नोव्हेंबरपासून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार

पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन; 4 नोव्हेंबरपासून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने माण-हिंजवडी ते शिवाजीनगर 'पुणेरी मेट्रो' (पिंक लाईन) चे उद्घाटन केले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांचीही आठवण काढली.

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो तीन मार्गिकेचे उद्घाटन आज, 3 नोव्हेंबरला झाले. उद्या, 4 नोव्हेंबरपासून या मार्गावर मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रो लाईन 3, म्हणजे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर 'पुणेरी मेट्रो' (पिंक लाईन), 4 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर आमदार, खासदार आणि नेते पुण्यात उपस्थित होते. कार्यक्रमात नेत्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या मेट्रोचे भूमिपूजन केले, तिचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक दिवस आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यात टाटा आणि सिमेन्स यांनी महत्त्वाचे योगदान दिले. हिंजवडी परिसर देशातील आयटी इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग असून लाखो कामगार तिथे रोज ये-जा करतात. ते या मेट्रोची आतुरतेने वाट पाहत होते. आता 100 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावणार आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात आज बारा महानगरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. आज केवळ पुणे मेट्रो फेज 3 चे लोकार्पण होत नसून फेज 2 च्या विस्तारीकरणाचे भूमिपूजनही होत आहे. यानंतर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो नेऊ, असेही फडणवीस म्हणाले. या कामात आपले, एकनाथ शिंदे यांचे, अजितदादांचे आणि सुनेत्रा वहिनींचेही योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांत लिहावा असाच आहे. हिंजवडी आयटी पार्क आज मेट्रोशी जोडले गेले आहे आणि उद्या खराडी आयटी पार्कही मेट्रोच्या जाळ्याला जोडले जाईल. अजितदादांनी यात मोलाचे योगदान दिले, गेल्या वर्षी त्यांनी हिंजवडीत येऊन पाहणीही केली होती. बोलताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. हा प्रकल्प पूर्ण होणार नाही, असे सुरुवातीला अनेक जण म्हणत होते, पण अजितदादांच्या स्वप्नातील प्रकल्प आज प्रत्यक्षात आला आहे, असे त्या म्हणाल्या.

शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प पुणेकरांसाठी आनंद द्विगुणित करणारा आणि दिवाळीची भेट देणारा असल्याचे म्हटले. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनी बारकाईने लक्ष दिले, असे ते म्हणाले. आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मग आपण झालो, पुन्हा देवेंद्रजी झाले, तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी विकासाची गंगा वाहती ठेवली, असे शिंदे यांनी सांगितले. मेट्रोत 50 टक्के महिलांना संधी दिली आहे. केवळ स्टाफमध्येच नव्हे, तर मेट्रोचे स्टेअरिंगही महिलांच्या हातात आहे, आपण पुरुष मायनॉरिटीत आलो आहोत, असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला. मधल्या काळात बरेच स्पीड ब्रेकर आले, त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. काहींना देशाचा विकास पाहून दुःख होते, ते विकासाला विरोध करतात, त्यांना देशातील 140 कोटी जनता उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. दिवाळीआधीच भेट मिळाल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. या उद्घाटनानंतर पुणेकरांना 55 किलोमीटरचा मेट्रो प्रवास करता येईल. आज भूमिपूजन होत असलेल्या मार्गामुळे आणखी 46 किलोमीटरची भर पडेल, म्हणजे पुढे 100 किलोमीटर मार्ग पूर्ण होईल आणि त्यानंतर आणखी 50 किलोमीटरचा विस्तार करणार असल्याचे मोहोळ म्हणाले. मागच्या सत्ताधाऱ्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त राजकारण केले, पण महायुती सरकारने पुण्याच्या भविष्याचा विचार केला, असेही ते म्हणाले.

मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पुण्याने नेहमीच समाजाला नवी दिशा दिली असून हेच पुणे विकसित भारताला गती देत आहे, असे ते म्हणाले. जुने सरकार आणि जुनी व्यवस्था असती, तर पुण्यात मेट्रो धावायला आणखी कितीतरी दशके लागली असती, असे ते म्हणाले. आमच्या सरकारच्या काळात 1200 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावते आणि 26 शहरांत 1 कोटींहून अधिक नागरिक रोज मेट्रोने प्रवास करतात, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मेट्रोमुळे लाखो रोजगार उपलब्ध झाले असून मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारले जात आहेत. सरकारमध्ये काम करताना आपल्याला 25 वर्षे पूर्ण झाली, मुख्यमंत्री असताना गरीब कल्याण योजना आणून गरिबी हटवण्याचा निर्धार केला आणि आजही त्याच धोरणांवर चालत आहोत, असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांचे विकसित भारतातील योगदान मोठे आहे, पण दुष्काळामुळे ते संकटात आहेत, असे मोदी म्हणाले. फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंधारण योजना राबवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळाची आपल्याला कल्पना आहे आणि राज्य सरकारने मदत केली आहे, असे सांगत त्यांनी मराठीत शेतकऱ्यांना संदेश दिला: काळजी करू नका, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. सण-उत्सवात शेतकऱ्यांना विसरू नका आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावूया, असे आवाहनही त्यांनी केले.

#पुणे#शहर#PT24#Civic#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ