मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बारामतीत एका रात्रीत १५८ मिलिमीटर पाऊस, रस्ते पाण्याखाली; नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी

बारामतीत एका रात्रीत १५८ मिलिमीटर पाऊस, रस्ते पाण्याखाली; नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असताना पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बारामतीत पहाटेपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नदीचे रूप आले, तर नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरासह बारामती, इंदापूर आणि जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेले काही दिवस पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः बारामतीत अवघ्या काही तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक फटका बारामती शहराला बसला आहे. २ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून पाऊस सुरू झाला आणि त्याचा जोर पुढे काही तास कायम राहिला. अवघ्या अडीच ते तीन तासांच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी भरले. सकाळी सात वाजेपर्यंत शहरात तब्बल १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एका रात्रीत महिनाभराचा पाऊस पडल्याने शहरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे रूप आले होते, अनेक रस्त्यांवर पाणी साचले.

भिगवण रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

पावसाची तीव्रता आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बारामती नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एका रात्रीत झालेल्या या जोरदार पावसामुळे बारामतीकर सुखावले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या भागांत या पावसाकडे दिलासादायक घटना म्हणून पाहिले जात आहे.

पुणे शहरातही कालपासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळीही शहरातील अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पुणे-नाशिक महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातूनही एक महत्त्वाची बातमी आहे. नीरा देवघर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ७५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान झाले होते. उभी पिके वाचवण्यासाठी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत होते.

#पुणे#शहर#PT24#Civic#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ