हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 4 नोव्हेंबरपासून धावणार, 3 नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते लोकार्पण
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका तीनवर पहिल्या टप्प्यात 23 पैकी 17 स्थानकांवरून सेवा मिळेल. तिकीट कमाल 62 रुपये आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिका तीनचे (पुणेरी मेट्रो, पिंक लाईन) लोकार्पण मंगळवारी, 3 नोव्हेंबरला होणार आहे. प्रवासी सेवा 4 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे लोकार्पण होणार आहे. बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी, 31 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. हिंजवडी आयटी पार्कमध्ये रोज ये-जा करणाऱ्या लाखो नोकरदारांची मेट्रोची वाट आता संपली आहे, असे या माहितीतून समोर आले. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारलेली ही मार्गिका 23.203 किलोमीटर लांबीची असून पूर्णपणे उन्नत आहे. तिच्यावर एकूण 23 स्थानके आहेत.
पहिल्या टप्प्यात 23 पैकी 17 स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रो पकडता येईल. माण या पहिल्या स्थानकापासून जिल्हा न्यायालय या शेवटच्या स्थानकापर्यंत सलग प्रवास करता येणार आहे. मात्र स्थानक क्रमांक 13, 14, 15, 16, 20 आणि 22 ही सहा स्थानके सुरुवातीला प्रवाशांसाठी खुली होणार नाहीत. तेथे सध्या चढता किंवा उतरता येणार नाही. त्यापैकी 13 आणि 14 क्रमांकाच्या स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि ते नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 15, 16, 20 आणि 22 क्रमांकाची स्थानके व त्यांचे जिने जानेवारी 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करून सेवेत आणले जातील.
पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता सुटेल. गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी, तर इतर वेळी दर 12 मिनिटांनी गाडी मिळेल. माणहून जिल्हा न्यायालयाकडे जाणारी शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता आणि जिल्हा न्यायालयातून माणकडे जाणारी शेवटची मेट्रो रात्री 11.40 वाजता सुटेल.
दहा स्थानकांवर दोन्ही जिने खुले असतील. ही स्थानके अशी: 4 (हिंजवडी फेज-2 सर्कल-2), 7 (श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी), 8 (हिंजवडी फेज-1), 9 (वाकड चौक), 10 (श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे), 11 (मिटकॉन, बालेवाडी), 12 (आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी), 17 (औंध), 18 (सकाळनगर) आणि 19 (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). सात स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी सुरुवातीला एकच जिना असेल: 1 (माण), 2 (माण-एमआयडीसी सर्कल फेज-2), 3 (माण-बस डेपो), 5 (हिंजवडी फेज-2 सर्कल-1), 6 (पद्मभूषण चौक), 21 (कृषी महाविद्यालय) आणि 23 (जिल्हा व सत्र न्यायालय).
तिकीट दराबाबत मात्र प्रवाशांना फरक जाणवणार आहे. मार्गिका तीनसाठी किमान 12 रुपये आणि कमाल 62 रुपये दर निश्चित केला आहे. महामेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (16.6 किलोमीटर) आणि वनाज ते रामवाडी (14.6 किलोमीटर) या मार्गिकांवर किमान तिकीट 10 रुपये आणि कमाल 35 रुपये आहे. म्हणजे किमान तिकिटात 2 रुपयांचा, तर कमाल तिकिटात 27 रुपयांचा फरक आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर अंतर 23.2 किलोमीटर आहे.
या मार्गिकेवरील सर्व गाड्या महिला ट्रेन पायलट चालवणार आहेत. त्यासाठी सुमारे 100 महिला ट्रेन पायलट आहेत. स्थानक नियंत्रक, तिकीट कर्मचारी आणि स्थानक परिचर धरून स्थानकांवरचे सुमारे 50 टक्के कर्मचारी महिला असतील. जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-1 व लाईन-2 शी जोडणी मिळेल. संयुक्त तिकीट ॲप, वातानुकूलित गाड्या आणि चार्जिंग सुविधा असतील, तसेच पीएमपीएमएल, रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक्सशी जोडणी उपलब्ध होईल.
मेट्रोसाठी 22 ट्रेन संच उपलब्ध आहेत. गाड्यांना 750 व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणालीतून वीज मिळेल आणि सीबीटीसी सिग्नल यंत्रणा वापरली आहे. 7.60 मेगावॅट सौरऊर्जानिर्मितीचे नियोजन असून एकूण विजेच्या गरजेपैकी 30 टक्के गरज त्यातून भागवण्याचे उद्दिष्ट आहे. 28 हजार टन कार्बन उत्सर्जन टाळणे, 2,000 टन स्टील आणि 60 कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे. 5,500 नवीन झाडे लावली जातील आणि 750 झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. दररोज 2 ते 2.5 लाख प्रवासी या मार्गिकेचा वापर करतील, असा अंदाज आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.