राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पिस्तूल आले कुठून? पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात
बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यात पाच जणांना अटक झाली, तरी पिस्तुलाचा स्रोत अजून सापडलेला नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे प्रकरणातले गूढ आणखीच वाढत चालले आहे. हल्ल्याला आठ दिवस उलटून गेले, तरी पुणे ग्रामीण पोलिसांना त्यामागचे खरे कारण उकलता आलेले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपासही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र आरोपींकडे पिस्तूल नव्हतेच, तर मग ते आले कुठून, असा प्रश्न आता विचारला जात आहे. हल्ल्यात वापरलेले पिस्तूल कुठून आले, याचा शोध सुरू आहे, पण त्याचे उत्तर अजून मिळालेले नाही.
पोलिसांच्या दाव्यानुसार प्रत्यक्ष हल्ला करणारे आणि सुपारी देणारे अशा दोघांनाही अटक झाली आहे. हल्लेखोरांना सत्तूर आणि पैसे पुरवले गेल्याचेही समोर आले आहे. पण हा गोळीबाराचा हल्ला होता असे मानले, तर घटनास्थळावरून गोळीची पुंगळी का गायब झाली, हा प्रश्न उरतोच.
पोलिसांनी कांबळे नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली. त्यांनी पिस्तूल पुरवल्याचा इन्कार केला आहे. पिस्तूल वापरले गेले असेल, तर ते मारेकऱ्यांपर्यंत कोणी पोहोचवले, या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडे अजून नाही. दुसरीकडे, हल्लेखोरांच्या म्हणण्यानुसार पिस्तूल वापरलेच नाही. तसे असेल, तर घटनास्थळावर पिस्तूल आले कुठून, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हल्ल्यामागची साखळी, सुपारी देणारे आणि आरोपी हाती लागूनही मुख्य शस्त्रच पोलिसांना सापडलेले नाही. हा तपासातला मोठा गोलमाल मानला जात आहे. सत्तूर आणि पैसे देणाऱ्याने पिस्तूल दिल्याचे नाकारले आहे. त्यामुळे पोलीस खरी माहिती लपवत आहेत का, की गुन्हेगारांचे धागेदोरे शोधण्यात यंत्रणा हतबल ठरली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
पोलीस अजूनही काही संशयितांच्या मागावर आहेत आणि नवीन नावेही समोर येत आहेत. पण हल्ल्यात वापरल्या गेलेल्या पिस्तुलाचा खरा स्रोत उघड होत नाही, तोपर्यंत पोलिसांची ही कारवाई वरवरची आणि दिशाभूल करणारी तर नाही ना, असा संशय सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एकूणच, आरोपी गळाला लागले असले तरी हल्ल्यातील शस्त्राचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर अजूनही कायम आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.