पुण्यात २५ हून अधिक जणांचे पोलीस संरक्षण काढले; फरार राणा सूर्यवंशी, हाके यांचे कायम
पोलीस संरक्षण गठीत समितीच्या २३ ऑक्टोबरच्या बैठकीत पुण्यातील २५ हून अधिक व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढण्याचा निर्णय झाला, तर राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांचे संरक्षण जसेच्या तसे ठेवण्यात आले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे शहर पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) यांनी २३ ऑक्टोबरला झालेल्या पोलीस संरक्षण गठीत समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील २५ हून अधिक व्यक्तींना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त प्रशांत अमृतकर (विशेष शाखा) यांच्या आदेशानुसार हे संरक्षण काढण्यात आले.
२४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सध्या फरार असलेला उद्योगपती राणा सूर्यवंशी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे पोलीस संरक्षण मात्र जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. राणा सूर्यवंशी याला वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण देण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनाही १+१ सशस्त्र गनमॅन आणि एस्कॉर्ट वाहनासह संरक्षण देण्यात आले आहे.
ज्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे, त्यांच्यात ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सरहद संस्थेचे संजय नहार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कोरेगाव भीमा प्रकरणातील वकील आशिष सातपुते, सिरम इंस्टिट्यूटचे सायरस पुनावाला आणि पुनीत बालन यांचीही नावे यात आहेत. राजकीय विश्लेषक तेहसिन पुनावाला, फिल्म निर्माते मिहिर कुलकर्णी, अजिंक्य डी.वाय.पाटील, व्यावसायिक मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यांचेही संरक्षण काढण्यात आले आहे. काही बांधकाम व्यावसायिकांचाही यात समावेश आहे.
पुणे शहर पोलीस उपायुक्तांची विशेष शाखा महिन्याभराने किंवा दोन महिन्यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेत असते. या आढावा बैठकीत कोणाची सुरक्षा ठेवायची, कोणाची वाढवायची आणि कोणाची काढायची, हे ठरवले जाते. २३ तारखेला अशीच एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यात सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
या निर्णयातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे राणा सूर्यवंशी हा बारामतीतील उद्योगपती सध्या फरार आहे. बारामती विमानतळाजवळ त्याच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर त्याला रुबी हॉस्पिटलला नेण्यात आले होते. तरीही त्याला दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. राजकारणी आणि ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके यांचीही सुरक्षा तशीच कायम ठेवण्यात आली आहे.
ज्यांची सुरक्षा काढण्यात आली, त्यापैकी साधारण १९ जणांची नावे एबीपी माझाच्या हाती आली आहेत. मोठे उद्योगपती, राजकीय विश्लेषक आणि फिल्म निर्माते यांचा त्यात समावेश आहे. पुण्यातील काही महत्त्वाच्या बांधकाम व्यावसायिकांची सुरक्षाही आता कमी करण्यात आली आहे. या निर्णयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही समोर आली आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.