पदवीधर-शिक्षक निवडणुकीत महायुतीला दोनच जागा; पराभवावर तिन्ही नेत्यांची बैठक होणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषदेच्या निकालात महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. महायुतीतील आरोप-प्रत्यारोप वाढल्याने एक-दोन दिवसांत पराभवावर मंथन होणार आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या पदरात फक्त दोन जागा पडल्या, तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महायुतीतले वाद, संघर्ष आणि एकमेकांचे पाय ओढणे यामुळेच हा पराभव झाला, असे बोलले जात आहे. निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदे सेनेमुळे हा पराभव झाल्याचा उघड आरोप केला. शिंदे सेनेनेही मागे न राहता भाजपला गद्दारीचा आरसा दाखवला. निवडणुकीच्या निमित्ताने तिन्ही पक्षांतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
या पार्श्वभूमीवर महायुतीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. पराभवावर मंथन करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत बैठक घेण्याचे ठरले आहे. महायुतीत सगळे आलबेल नाही, हे चित्र यामुळे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांची ही बैठक असेल. पराभवाचे विश्लेषण, अंतर्गत वाद आणि पुढे होणारे नुकसान कसे आवरायचे, म्हणजे डॅमेज कंट्रोल, यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीत खास करून पुणे आणि संभाजीनगरमधील पराभवावर चर्चा होईल आणि सगळ्यात जास्त फोकस याच दोन शहरांवर राहील, असे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून अमरावतीचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न होईल, असेही बोलले जात आहे. रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीची मागणी भाजप करणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे धंगेकर यांच्यावर बैठकीआधीच कारवाई होणार की बैठकीनंतर, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धंगेकर यांच्यावर कारवाई झाली तर अब्दुल सत्तार यांचे काय, असा सवाल राष्ट्रवादीकडून विचारला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निकालानंतर आरोप-प्रत्यारोपांना जोर आला. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. धंगेकर यांनी केसाने गळा कापला आहे, असे बन म्हणाले. शिंदे यांनी झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे धंगेकर यांनी राज्यातील नेतृत्वावर जनता नाराज असल्याचे सांगत नेतृत्व बदल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
शिंदे सेनेचे आनंद परांजपे यांनी विचारले की, सगळ्याच जागा भाजपने लढवाव्यात का आणि हा अट्टाहास कशासाठी? अमरावती आणि संभाजीनगरमध्ये तुमच्या नेत्यांनी आमच्याविरोधात प्रचार कसा केला, असाही सवाल त्यांनी केला. शिंदे यांचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मी उघडपणे शरद पवार गटाचा प्रचार केला, तेव्हा मला कोणी का काही बोलले नाही?
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.