गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पाच जागांचे निकाल जाहीर: नागपूर, मराठवाडा, पुणे आणि अमरावतीत कोण जिंकले

पाच जागांचे निकाल जाहीर: नागपूर, मराठवाडा, पुणे आणि अमरावतीत कोण जिंकले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 राजकारण डेस्क

विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल जाहीर झाला असून नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी, पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, मराठवाडा पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर या मतदारसंघांत ही निवडणूक झाली. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्यातही नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची झाली होती.

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात मुख्य लढत होती. नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली होती. ती पहाटेपर्यंत चालली आणि आज सकाळी सहा वाजता निकाल जाहीर झाला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी बाजी मारली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मिळून त्यांना एकूण 67 हजार 231 मते मिळाली, तर भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील 18 हजार 124 मतांनी विजयी झाले. त्यांना 85 हजार 876 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना 67 हजार 752 मते पडली. पसंतीक्रमानुसार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सानप यांचा पराभव केला. या निवडणुकीत विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचाही पराभव झाला.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव झाला आणि हर्षदा जाधव देशमुख तब्बल 9 हजार 700 मतांनी विजयी झाल्या. पहिल्या फेरीपासून स्मिता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली, मात्र नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले. महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार असलेल्या सरनाईक यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव केला. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत त्यांचा विजय निश्चित झाला. त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मागील 2020 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून लढत जिंकली होती.

पाचही जागांवरील विजयी उमेदवार असे: पुणे पदवीधर - हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार), पुणे शिक्षक - कौस्तुभ गावडे (भाजप), नागपूर पदवीधर - अभिजित वंजारी (काँग्रेस), मराठवाडा पदवीधर - डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार), अमरावती शिक्षक - किरण सरनाईक (शिवसेना शिंदे).

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ