पदवीधरमधील पराभव जिव्हारी, कुणाची विकेट पडणार? रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नागपूर आणि पुणे विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा राखता आली. अमरावती शिक्षक मतदारसंघात मित्रपक्ष शिवसेनेने लढत देऊन विजय मिळवला. पण पदवीधरच्या तीन मतदारसंघांत भाजपचे पानिपत झाले आणि हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यातही नागपूरमधला पराभव म्हणजे दुखऱ्या जागेवरच बोट ठेवल्यासारखा झाला आहे. या पराभवाची चर्चा सुरू झाली असून आता खापर कुणावर फुटणार, हेही समोर आले आहे.
आता या पराभवाची समीक्षा सुरू झाली आहे. नागपूर आणि पुण्यात पराभव का झाला, याची कारणे शोधली जाणार आहेत. पक्षसंघटना आक्रमक झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आले आहेत. नागपूर आणि पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा लेखाजोखा ते घेणार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आढावा होईल. नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या आढाव्यात जिल्हाध्यक्ष, आमदार आणि मंत्र्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. काही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये भाजपची विकेट पडल्यामुळे आता अनेक पदाधिकाऱ्यांच्या विकेट पडतील, असा अंदाज आहे.
नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती आणि ते प्रचारातही उतरले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरिरीने प्रचार केला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. इतके सगळे नेते मैदानात असूनही होमटाऊनमध्ये भाजपचा पराभव झाला. नागपूरमधील हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, पराभवाचे खापर कुणावर फोडायचे, यालाही सुरुवात झाली आहे. भाजपने या पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आणि पुणे पदवीधर मतदारसंघात शिंदे सेनेवर खापर फोडण्यात आले आहे. पराभवाची समीक्षा करताना महायुतीतील मित्रपक्षांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलही प्रदेशाध्यक्ष अहवाल देणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविंद्र चव्हाण येत्या 2 नोव्हेंबरला भेट घेणार आहेत. पराभवाचे संपूर्ण विश्लेषण ते शाह यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.