५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपचा तपास आता एसआयटीकडे, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सूत्रे
मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सदस्यांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे त्याचे अध्यक्ष आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मनोज जरांगे पाटील यांची ५०० कोटींची ऑडिओ क्लिप गेल्या आठवड्यात चांगलीच गाजली. या क्लिपमुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले. शिंदे सेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक वाद रंगला. या क्लिपवरून रोज नवनवीन दावे आणि प्रतिदावे सुरूच आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन केले आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, की एआयने तयार केलेली आहे, हे पथक तपासणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने एका आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष तपास समिती नेमण्यात आली आहे. ही तीन सदस्यांची समिती आहे. बलकवडे यांच्यासोबत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडे यांचाही समितीत समावेश आहे. ही क्लिप कोणी कुणाला पाठवली, तिची सत्यता काय आणि त्यातला आवाज कोणाचा, याचा तपास केला जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
आता ही समिती कोणाकोणाची चौकशी करते आणि त्यातून काही नवा ट्विस्ट समोर येतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांवरून राज्यात सध्या मोठे वादंग सुरू आहे.
बलकवडे यांचा अंतरवाली सराटीशी संबंध आहे. तीन वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना लाठीहल्ला झाल्याचा आरोप झाला आणि आंदोलन पेटले. त्यावेळी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागी बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली होती. जालन्यात मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आली होती.
बलकवडे यांनी याआधी गोंदिया, नागपूर ग्रामीण आणि कोल्हापूर इथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. गडचिरोलीच्या नक्षलवादी भागात त्यांनी दोन वर्षे सेवा बजावली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बलकवडे हे २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. याआधी त्यांनी नागपूर शहर आणि अहिल्यानगर इथेही सेवा बजावली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.