राज ठाकरेंनी सबीर भाटियांच्या डॉक्युमेंट्रीची पोस्ट हटवली, पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सबीर भाटिया यांच्या डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट केली आहे. जानेवारी २०२६ चे सादरीकरण मात्र त्यांनी पुन्हा समोर आणले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री आपल्या सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढून टाकावी, अशी विनंती आपल्याला करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. त्या विनंतीचा मान राखतोय इतकंच, म्हणून पोस्ट हटवत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे म्हणतात, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की वरच्यांच्या पोटात गोळा येणे आणि आपलं गुपित फुटेल याची भीती वाटणे स्वाभाविक होतं. पण ती भीती इतकी तीव्र असेल की थेट पोलीस आयुक्तांमार्फत डॉक्युमेंट्री काढण्याची विनंती केली जाईल, असं वाटलं नव्हतं. त्यांना जे म्हणायचं होतं, ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि आता या डॉक्युमेंट्रीची पोस्ट टाकण्याच्या निमित्ताने सांगून झालं आहे. देशाचं प्रबोधन व्हावं हाच उद्देश होता आणि आहे, असंही ते म्हणाले.
आलेली विनंती मुंबई पोलीस आयुक्तांची आहे, यावर त्यांनी भर दिला. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर राहिला आहे, असं ठाकरे म्हणाले. अशा पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखण्यासाठी पोस्ट डिलीट करतोय, असं त्यांनी सांगितलं.
पोस्ट हटवली तरी लढा थांबलेला नाही, असं ठाकरे यांनी लगेच जोडलं. जी आग लागायची ती लागली आहे, असं ते म्हणाले. जानेवारी २०२६ मध्ये शिवतीर्थावरून देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात आपण ठिणगी टाकली होती आणि तिचा वणवा पेटला आहे, असा त्यांचा दावा आहे. जानेवारी २०२६ ची त्यांची पोस्ट अजूनही तिथेच आहे आणि तिथेच राहील. डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती, तीही लोकांपर्यंत पोहोचावी हा हेतू होता आणि तो साध्य झाला, असं ते म्हणाले. या विषयावर आपण केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आता पुन्हा समोर आणत आहोत. जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग पुन्हा देत आहोत, तो परत एकदा नक्की बघा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
आपल्या निवेदनात ठाकरे यांनी प्रतिसादाचे आकडेही सांगितले. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना किती जुना आहे आणि त्यातून भारतीय उद्योग विश्व अदानींच्या घशात कसं घातलं जात आहे, याची पूर्ण माहिती देणारी ही डॉक्युमेंट्री होती. फक्त ट्विटरवरच त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि फेसबुकवरही प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. इतर लोकांनी शेअर केलेल्या व्हिडीओचे व्ह्यूज तर मोजताच येत नाहीत, असं ते म्हणाले. सबीर भाटिया यांनी डॉक्युमेंट्री आत्ता बनवली, पण त्याआधी जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतीर्थावरून आपण मोठं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यात अदानी समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे, हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय प्रतिसाद मिळाला, ते व्हिडीओ आजही त्यांच्या सोशल मीडियावर आहेत आणि त्यातल्याच काही क्लिप्स डॉक्युमेंट्रीतही वापरल्या गेल्या, असं ते म्हणाले.
आपली भूमिका आधी अनेकदा स्पष्ट केली आहे, असं सांगत ठाकरे म्हणाले की, त्यांचा विरोध व्यक्तीला नाही, एकाधिकारशाहीला आहे. पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत, त्यातून प्रचंड रोजगार आणि प्रचंड पैसा देशात निर्माण व्हावा, असं आपण भाषणांतून अनेकदा सांगितलं. देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी, असंही त्यांचं म्हणणं आहे. पण एकाचेच लाड केले आणि त्यामुळे देशाला धोका निर्माण होणार असेल, तर त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. अदानीच काय, कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच, असं ते म्हणाले.
भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरातमधल्या टोरेंट कंपनीला देण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितलं आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी सरकारने ठरावीक मित्र उद्योगपतींना दिल्या आहेत आणि आणखी द्यायचं ठरवलं आहे, असंही ते म्हणाले. कोण कुठल्या पक्षात आहे याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही, पण डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही, याचं आश्चर्य वाटतं, असं ते म्हणाले. मराठी खासदार, आमदार आणि मंत्र्यांना राग येत नाही का, असा सवाल करत सत्तेसमोर इतकं शरण जाणं महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारं नाही, असं त्यांनी म्हटलं. शिवछत्रपतींच्या घोषणा द्यायच्या आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करायचा, हे कशाला, असंही त्यांनी विचारलं.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.