मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

कांदिवलीत रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अर्ध्या तासात 14 दुचाकी घसरल्या, अनेक जण जखमी

कांदिवलीत रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अर्ध्या तासात 14 दुचाकी घसरल्या, अनेक जण जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

मुंबईच्या कांदिवली पूर्व भागात 1 नोव्हेंबरला अवघ्या 30 मिनिटांत 14 दुचाकी ऑइलवरून घसरल्या आणि अनेक दुचाकीस्वार जखमी झाले.

मुंबईच्या कांदिवली पूर्व भागात 1 नोव्हेंबरला रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अपघातांची मालिकाच घडली. अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 14 दुचाकी त्या ऑइलवरून घसरत फरफटत गेल्या. या अपघातांत अनेक जण जखमी झाले आहेत.

हे सगळे उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरच्या रस्त्यांवर घडले. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर ऑइल सांडलेले होते आणि त्यावरून दुचाकी एकामागून एक सटासट घसरल्या. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले आणि जखमी झाले. एकाच ठिकाणी इतक्या दुचाकी घसरल्याने अनेकांना जायबंदी व्हावे लागले. एकापाठोपाठ एक गाड्या घसरत गेल्याने तिथून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये एकच दहशत पसरली.

मुंबईत अपघातांची यादी आधीच मोठी आहे. लोकल ठप्प झाल्यानंतर होणारे अपघात, लोकलमधून पडून होणारे अपघात, लोकलचा बोजवारा उडाल्यावर प्लॅटफॉर्म ओलांडण्याच्या घाईत होणारे अपघात, बेस्टच्या बसचे अपघात आणि धनदांडग्यांच्या कारखाली चिरडून होणारे अपघात, हे सगळे कमी होते म्हणूनच की काय, आता रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळेही अपघात होऊ लागले आहेत.

रस्त्यावरचा प्रवास असो, लोकलचा असो किंवा बेस्टमधून होणारा असो, तो मुंबईकरांच्या नेहमी जीवावरच उठतोय का, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आणि हे अपघात टाळावेत, अशी मागणी आता सामान्य मुंबईकर करत आहेत.

रेल्वेच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही. कांदिवलीतील या घटनेच्या अवघ्या सहा दिवस आधी मुंबईत रेल्वे रुळांवर तिघांचे मृतदेह सापडले होते. त्या वेळी अनेक लोकल ट्रेन तब्बल 10 तास अडकून पडल्या होत्या आणि प्रवाशांना रुळांवरून चालत जावे लागले होते.

कांजूरमार्ग स्टेशनजवळ लागलेल्या आगीमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत व्यत्यय आला. त्यामुळे विक्रोळी-ठाणे मार्गावरची सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली. घाटकोपर-विक्रोळी सेक्शनमध्ये दोन मृतदेह आढळले, तर भांडुपमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्ती रुळ ओलांडत असताना त्यांना ट्रेनची धडक बसली.

सिग्नलमधील बिघाडामुळे मुख्य मार्गावरची लोकल सेवा अनेक तास पूर्णपणे बंद ठेवावी लागली आणि हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. कांजूरमार्ग स्थानकावरील रिले रूममध्ये आग लागल्याने सिग्नल यंत्रणा निकामी झाली आणि चारही लोकल लाईन्सवरील सेवा विस्कळीत झाली. मात्र सायंकाळपर्यंत सेवा पूर्ववत करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कांजूरमार्ग येथील सिग्नलिंग हटमध्ये लागलेल्या आगीमुळे कांजूरमार्ग आणि भांडुप स्थानकांदरम्यानच्या सर्व सहा लाईन्सवरील जवळपास 24 सिग्नल प्रभावित झाले.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ