दिया मिर्झाचा व्हिडीओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या ट्विटनंतर "कोणतेही पैसे घेतलेले नाहीत" म्हणत दियाची
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई महानगरपालिकेच्या दिवाळीतील जनजागृती मोहिमेतून अभिनेत्री दिया मिर्झा हिचा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट केल्यानंतर तो हटवला, असे सांगितले जात आहे.
वाढते प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रिकेटपटू आणि सिनेविश्वातील कलाकारांच्या मदतीने ही मोहीम राबवली जात असून, पालिकेकडून अनेक सिनेकलाकार जनजागृती करत आहेत. या सेलिब्रिटी मोहिमेवरून आता मुंबई महानगरपालिकेत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेने अनेक सेलिब्रिटींचे या विषयावरील व्हिडीओ पोस्ट केले. त्यात अभिनेत्री दिया मिर्झा हिचाही एक व्हिडीओ पालिकेच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आला होता. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करून पालिकेला टॅग केले आणि काही प्रश्न उपस्थित केले. "दिवाळी कशी साजरी करावी याबाबत दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा, संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत," असे साटम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आता पालिकेच्या सोशल मीडियावरून दिया मिर्झा हिचा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. या मोहिमेत माधुरी दीक्षित, महेश कोठारे, शिव ठाकरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांचे व्हिडीओ आहेत. पण त्या सर्वांमधून फक्त दिया मिर्झा हिचाच व्हिडीओ मुंबई महानगरपालिकेकडून हटवण्यात आला आहे.
व्हिडीओ का हटवला, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर तो डिलिट करण्यात आला, असे सांगितले जात आहे. या प्रकारावर दिया मिर्झा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे.
पालिकेने व्हिडीओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झा हिने सोशल मीडियावर कमेंट केली आहे. "कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. आता तर चांगुलपणाचा जमनाच राहिला नाही," असे तिने या कमेंटमध्ये म्हटले आहे. दिया हिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
एकूणच, पर्यावरणपूरक दिवाळीसाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेतील एका व्हिडीओवरून अमित साटम यांचे ट्विट, तो व्हिडीओ हटवला जाणे आणि त्यानंतर दिया मिर्झा हिची कमेंट असा विषय समोर आला आहे. व्हिडीओ हटवण्याचे कारण मात्र पालिकेकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.