दुष्काळामुळे शिवाजी पार्कवरची दिवाळी रोषणाई आणि आतिषबाजी मनसेकडून रद्द, फक्त कंदील लावणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शिवाजी पार्कवर साधेपणाने दिवाळी साजरी करणार असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
मुंबई : शिवाजी पार्कवर दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी केली जाणारी रोषणाई मनसेने यंदा अधिकृतपणे रद्द केली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.
किल्लेदार यांनी सांगितले की, आमचा पक्ष लहान असला तरी यंदा रोषणाई आणि आतिषबाजी करणार नाही, असे मनसेकडून ठरवण्यात आले आहे. शिवाजी पार्कवर फक्त कंदील लावून साधेपणाने दिवाळी साजरी केली जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी रोषणाई आणि आतिषबाजी करून दीपोत्सव साजरा करते. पण यंदा या दीपोत्सवातील रोषणाई आणि आतिषबाजी रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट आहे, म्हणून हा निर्णय घेतल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. किल्लेदार यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती गंभीर असल्यामुळे यावर्षी शिवाजी पार्कवर केवळ कंदील लावून दिवाळी साजरी करणार आहोत.
यावेळी किल्लेदार यांनी अमित साटम यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले की, एका बाजूला एकाच मंचावर आशिष शेलार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना वातावरण हसत खेळत होते. मग दुसऱ्याच दिवशी अमित साटम यांना राज ठाकरेंवर बोलण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला. साटम यांच्याकडून कोणत्या मुद्द्याच्या आधारावर पाकिस्तानी एजंट वगैरे अशी टीका केली गेली, असेही किल्लेदार यांनी विचारले.
साटम यांनी आमच्यावर टीका करण्याआधी मुंबई भाजपमध्ये उभी फूट पडलेली आहे, ती आधी पाहावी, असे किल्लेदार म्हणाले. अमित साटम यांना कोणी उभे करत नाही आणि त्यांना कोणी विचारत नाही, असा टोला त्यांनी लगावला. साटम यांनी आधी स्वतःच्या पक्षातली फूट आणि वाद पाहावेत, मग आमच्यावर टीका करावी, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
नाशिकमधील कुंभमेळ्याचाही मुद्दा किल्लेदार यांनी मांडला. कुंभमेळ्यासाठी तिथे वारेमाप खर्च केला जात आहे, असे ते म्हणाले. याआधी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून कुंभमेळ्याचे आयोजन केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र आधीच दुष्काळात आहे आणि गरीब शेतकऱ्यांना फक्त 5000 रुपयांचीच मदत केली आहे. अशा वेळी कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींचे टेंडर काढण्याची गरज नाही, असे किल्लेदार यांनी स्पष्ट केले.
आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, पण टेंडर काढून मोठ्या प्रमाणात जो खर्च केला जात आहे, त्याला विरोध आहे, असे ते म्हणाले. कुंभमेळा साधेपणानेही साजरा करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. आम्ही लहान पक्ष असूनही दुष्काळी परिस्थितीमुळे आतिषबाजी आणि रोषणाई रद्द करू शकतो, तर तुम्ही सत्ताधारी आणि मोठा पक्ष आहात, तुम्हीही ते करू शकता, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.