दिवाळीच्या आठवणींत रमले झी मराठीचे कलाकार, कुणाला किल्ला तर कुणाला फराळ प्रिय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज हंचनाळे, विजया बाबर, रोहित परशुराम, शिवानी सोनार यांच्यासह आठ कलाकारांनी लहानपणीची आणि आताची दिवाळी कशी असते, ते सांगितलं आहे.
दिवाळी आली की घराची साफसफाई, फराळाची धावपळ, नवे कपडे, आकाशकंदील, रांगोळी आणि पणत्यांचा उजेड आठवतो. या सणाला घरातले सगळे एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात. तरीही प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या असतात. कुणाला आईसोबतची साफसफाई आठवते, कुणाला मित्रांसोबत बनवलेला किल्ला, तर कुणाला घरी केलेल्या फराळाची चव. जबाबदाऱ्या वाढल्या आणि कामाचं स्वरूप बदललं, तरी दिवाळीचा उत्साह आजही तसाच आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त झी मराठीच्या कलाकारांनी आपल्या बालपणीच्या आठवणी आणि आजची दिवाळी याबद्दल मन मोकळं केलं आहे.
'सनई चौघडे' मालिकेत जयची भूमिका करणारा राज हंचनाळे म्हणतो, "असं म्हणतात, देव जेव्हा देतो, तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो. यंदा मला याचा खऱ्या अर्थाने अनुभव येतोय. या वर्षी दिवाळीत माझ्या आयुष्यात लक्ष्मी दोन रूपांत आली आहे. एक माझी छोटी मुलगी आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम!" या मालिकेला 'बेस्ट शो'चा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही त्याने बोलून दाखवला. प्रेक्षकांचं प्रेम आणि सोशल मीडियावरचे संदेश त्याला सुखावतात. यंदा तो कुटुंबासोबत आणि छोट्या लेकीसोबत पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करणार आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली खरी ताकद आहे, असंही त्याने आवर्जून सांगितलं.
'कमळी' मालिकेतील कमळी म्हणजेच विजया बाबरला सध्या शूटिंगमुळे आईला दिवाळीच्या तयारीत फारशी मदत करता येत नाही. पण लहानपणच्या आठवणी तिच्या मनात ताज्या आहेत. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे शाळा किंवा कॉलेजमधून आल्यावर ती आईसोबत साफसफाई करायची. विजया सांगते, "मला फराळ बनवायला खूप आवडतं. लहानपणी मी आईला रंगरंगोटी न केलेले साधे दिवे आणायला सांगायचे. मग ते दिवे मी घरी बसून छान रंगवायचे. माझ्या हाताने रंगवलेला दिवा दिवाळीच्या दिवशी घरात लावला जातो, याचा मला खूप आनंद व्हायचा."
'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत शंकर साकारणारा रोहित परशुराम कामासाठी मुंबईत राहतो, त्यामुळे पूर्वीसारखं तयारीत उतरता येत नाही. लहानपणी मात्र घरातले पंखे पुसण्यापासून आईला फराळात मदत करण्यापर्यंत तो सगळ्यात पुढे असायचा. गरमागरम करंजी खाण्याची मजा काही औरच, असं तो म्हणतो. वडिलांसोबत भोरच्या बाजारात खरेदीला जाणं, आवडीचा आकाशकंदील घरी आणणं आणि शाळेतल्या आकाशकंदील स्पर्धेत भाग घेणं हेही त्याला आठवतं. भोरमधली दिवाळी, तेव्हाची थंडी आणि धुकं आजही त्याच्या लक्षात आहे.
'तारिणी' मालिकेतील तारिणी म्हणजेच शिवानी सोनारसाठी दिवाळी नेहमीच आवडता सण आहे. मालिकेच्या सेटवर आणि घरी, अशा दोन्ही ठिकाणी सण साजरा होतो, म्हणून हा आनंद तब्बल १० ते १२ दिवस मिळतो, असं ती सांगते. यंदा घर सजवण्याची जबाबदारी तिने घेतली असून ती ऑनलाइन खरेदी करत आहे. षटकोनी आकाराचा, एकाच रंगाचा पारंपरिक आकाशकंदील तिला विशेष आवडतो. लहानपणी भावासोबत किल्ला बनवताना माती गोळा करणं, दगड आणणं, मावळे विकत घेणं किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणं, याची आवड तिला आजही आहे. त्यामुळे फराळापेक्षा किल्ला बनवण्यात तिला जास्त रस आहे.
'धाकट्या सुनबाई' मालिकेत वेदांत साकारणारा मंदार जाधव सध्या साफसफाईत थोडी मदत करतो, खरेदी करतो आणि फराळाचा आनंद घेतो. लहानपणी नवे कपडे, फटाके आणि आईने केलेला फराळ याची त्याला खास उत्सुकता असायची. घर सजवणं, आकाशकंदील बनवणं, लाईटिंग करणं आणि वेगवेगळे पदार्थ करणं यात वेगळीच मजा होती. जबाबदाऱ्या वाढल्या असल्या, तरी उत्साह तसाच आहे, असं तो सांगतो. त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सुंदर अनुभव आहे.
'सनई चौघडे' मालिकेत असावरी साकारणाऱ्या जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरीसाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबतची धमाल. आई आणि बहिणींसोबत साफसफाई करतानाची गंमत, सजावटीची खरेदी आणि घरी एकत्र बसून फराळ करणं तिला आवडतं. गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीचं सामान ती स्वतः आणते. स्वतः कमावून घराची जबाबदारी पार पाडताना तिला आनंद वाटतो. बहीण निकितासोबत दरवर्षी रांगोळी काढण्याची आठवण तिला भावूक करते. निकिताचं लग्न झाल्यानंतर ती हैदराबादला राहते, म्हणून रांगोळी काढताना जुईला तिची खूप आठवण येते.
'कमळी' मालिकेत ऋषी साकारणाऱ्या निखिल दामलेसाठी दिवाळी वर्षातल्या आवडत्या सणांपैकी एक आहे, कारण आई आणि आजीच्या हातचा फराळ. दरवर्षी सगळं कुटुंब एकत्र येऊन पार्टी करतं, फराळ खातं आणि वेगवेगळे खेळ खेळतं. लहानपणी मित्रांसोबत किल्ला बनवणं ही त्याची सर्वात सुंदर आठवण आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती करणं आणि किल्ला स्पर्धांमध्ये उतरणं याची त्याला विशेष आवड होती. यंदा शूटिंगमुळे तयारीत भाग घेता येणार नाही, याची खंतही त्याने बोलून दाखवली.
'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत गौरी साकारणारी ट्विंकल यादव लहानपणी दिवाळीला गावी जायची. तिथे सगळे एकत्र बसून फराळ करायचे आणि ती आवडीने ते पाहायची. थोडी मदतही करायची, पण तिचं मुख्य लक्ष फटाके फोडण्याकडे असायचं. आता खरेदीपासून घराला काय हवं, काय नको, इथपर्यंतच्या चर्चेत ती आईसोबत असते. पूर्वी छोटी-मोठी मदत करणारी ट्विंकल आता फराळ बनवण्यातही आवडीने हातभार लावते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.