चिन्मयी मोरे साकारणार 'राधिका'; झी मराठीवर २८ सप्टेंबरपासून 'धाकट्या सुनबाई'
नागपूरची अभिनेत्री चिन्मयी मोरे पहिल्यांदाच डेली सोपमध्ये प्रमुख भूमिकेत, झी मराठीच्या नव्या मालिकेत 'राधिका'च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर.
झी मराठीवर २८ सप्टेंबरपासून 'धाकट्या सुनबाई' ही नवी मालिका सुरू होत आहे. नात्यांमधला जिव्हाळा, माणुसकी आणि भावनांची गुंफण ही मालिकेची मध्यवर्ती संकल्पना असून, यात अभिनेत्री चिन्मयी मोरे 'राधिका' या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावाची राधिका आपल्या माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभी राहणारी व्यक्तिरेखा असून, ती प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा तयार करेल, असा विश्वास चिन्मयीने व्यक्त केला आहे.
नागपूरची असलेली चिन्मयी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. 'धाकट्या सुनबाई'च्या निमित्ताने ती पहिल्यांदाच डेली सोपमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. आपल्या या नव्या प्रवासाबद्दल आणि राधिका या व्यक्तिरेखेबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
चिन्मयी सांगते की, तिची आई नाट्य क्षेत्रात असल्यामुळे लहानपणापासूनच तिचा या क्षेत्राशी संबंध आला. अवघ्या १० दिवसांची असताना ती पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली आणि नंतर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करू लागली. पुढे व्यावसायिक नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि जाहिरातींमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली, मात्र डेली सोपचा अनुभव तिच्यासाठी पहिलाच आहे. तिचं मूळ स्वप्न पायलट होण्याचं होतं, पण काही कौटुंबिक कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि अभिनयाचा हा प्रवास तिच्यासाठी लिहिलेला होता, असं ती म्हणते.
राधिका ही व्यक्तिरेखा सोज्वळ, प्रेमळ आणि मनमिळावू असून आजूबाजूच्या प्रत्येकाची मनापासून काळजी घेणं हा तिच्या स्वभावाचा भाग आहे. दुःख किंवा अडचणी आल्या तरी त्यातही सुख शोधून आनंदी राहण्याचा तिचा प्रयत्न असतो आणि परिस्थिती कठीण असली तरी ती आपल्या माणसांची साथ कधीच सोडत नाही, असं चिन्मयी सांगते.
या भूमिकेसाठी चिन्मयीची निवड ऑडिशनमधून झाली. गजानन महाराजांची भूमिका साकारलेल्या अमित फाटक यांनी प्रोडक्शनमध्ये तिचं नाव सुचवलं, त्यानंतर फोटो पाहून तिला ऑडिशनसाठी कॉल आला आणि ऑडिशननंतर तिची निवड झाली. भूमिकेच्या तयारीबाबत ती सांगते की, प्रत्येक सीनआधी ती स्वतःला राधिकाच्या जागी ठेवून त्या क्षणी राधिका काय विचार करेल आणि काय अनुभवेल, हे समजून घेण्याचा प्रयत्न करते.
मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाल्याचं चिन्मयी सांगते. राधिका आणि वेदांत या जोडीला प्रेक्षक कसं स्वीकारतात, याची तिला उत्सुकता आहे. सहकलाकार आणि टीमबद्दल बोलताना ती सांगते की, दिग्दर्शक चंद्रकांत कणसे तिला प्रेमाने सांभाळून घेतात आणि शिकवतात. सहकलाकार मंदार जाधवसोबतही तिचं ट्युनिंग चांगलं जमलं असून, ऑफस्क्रीनही दोघं चांगले मित्र झाले आहेत.
प्रेक्षकांना संदेश देताना चिन्मयी म्हणते की, झी मराठीच्या इतर मालिकांप्रमाणेच 'धाकट्या सुनबाई'लाही तितकंच किंवा त्याहून जास्त प्रेम द्यावं. मालिका २८ सप्टेंबरपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.