'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये स्वानंदी-समरच्या आयुष्यात गुड न्यूज? नव्या प्रोमोत प्रेग्नन्सी टेस्ट किट
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
झी मराठीवरील मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये स्वानंदीच्या हातातून प्रेग्नन्सी टेस्ट किट खाली पडतं आणि समर आनंदाने विचारतो, आपल्याला बाळ होणार?
झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' ही लोकप्रिय मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून, त्यामुळे स्वानंदी आणि समर यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची शक्यता दिसते आहे. स्वानंदी लवकरच समरला गुड न्यूज देणार का, असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
झी मराठीने हा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये समर आणि स्वानंदी यांच्यातला हा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यात समर खोलीत येतो आणि स्वानंदीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण स्वानंदी काहीतरी लपवत असल्याचं दिसतं. नेमकं काय लपवलं आहे हे जाणून घेण्यासाठी समर तिच्या मागे जातो.
याच गडबडीत स्वानंदीच्या हातातून प्रेग्नन्सी टेस्ट किट खाली पडतं. ते पाहून समर आश्चर्याने आणि आनंदाने तिला विचारतो, "प्रेग्नन्सी टेस्ट किट? आपल्याला बाळ होणार?" त्यावर स्वानंदी म्हणते, "असं वाटतंय, आधी टेस्ट करून बघू." त्यानंतर ती टेस्ट करण्यासाठी जाते. बाहेर मात्र समरची उत्सुकता शिगेला पोहोचते आणि तो अस्वस्थ होऊन खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारताना दिसतो.
यापूर्वी मालिकेत स्वानंदीला तिच्या वयावरून टोमणे ऐकावे लागले होते. वय वाढल्यामुळे तिला मूल होणार नाही, असं म्हणत काही स्त्रिया तिला बोल लावताना दिसल्या होत्या. या बोलण्यामुळे स्वानंदी दुखावली होती. अशा कठीण प्रसंगी समरने तिची समजूत काढून तिला आधार दिला होता. आता मात्र स्वानंदीच्या आयुष्यात खरंच आनंदाची बातमी येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
आतापर्यंत स्वानंदी आणि समर यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण प्रत्येक संकटात दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. आतापर्यंतच्या प्रवासात दोघांनी अनेक अडचणींचा सामना केला, तरीही त्यांनी एकमेकांना सोडलं नाही. सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या या जोडीच्या आयुष्यात आता आनंदाची चाहूल लागल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
स्वानंदी खरंच समरला गुड न्यूज देणार का आणि प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट काय येणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या नव्या ट्विस्टबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने 'स्वानंदी देणार समरला गुड न्यूज' असं कॅप्शन दिलं आहे. स्वानंदी आणि समर यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू होणार का, हे आगामी भागांतच स्पष्ट होईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.