नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला 45 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान, महासभेत सर्वानुमते मंजुरी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेने अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविका यांना प्रत्येकी 45 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महापालिकेच्या महासभेत सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविका यांना यंदा दिवाळीनिमित्त प्रत्येकी 45 हजार रुपयांचे एकसमान सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. म्हणजेच पदाने कोणी अधिकारी असो वा शिक्षक, सर्वांना सारखीच रक्कम मिळणार आहे. या निर्णयामुळे पालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी सानुग्रह अनुदानाचा हा प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. युनियनने 43 हजार रुपयांची मागणी केली होती. पण कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी, या उद्देशाने मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्कम थेट 45 हजार रुपये करण्यात आली, असे सागर नाईक यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी साधारण 34,500 रुपये सानुग्रह अनुदान दिले गेले होते, तर आशा स्वयंसेविकांना 18,500 रुपये मिळाले होते. यंदा मात्र आशा स्वयंसेविकांनाही थेट 45 हजार रुपयांच्या टप्प्यात आणण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या निर्णयामुळे महापालिकेतील सुमारे 5121 कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे 23 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात पुनर्विनियोजन करावे लागेल. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कारवाई सुरू असल्याने, त्यांचा आकडाही यामध्ये जोडला जाईल.
नगरसेवक रवींद्र इथापे यांनी बोलताना सांगितले की, नवी मुंबई पालिकेने करार, कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सरसकट ही रक्कम देऊन राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी 2019 मध्ये ही रक्कम 23,500 रुपयांपासून सुरू झाली होती, ती आता थेट 45 हजारांवर पोहोचली आहे, असेही त्यांनी म्हटले.
महापौर सुजाता पाटील यांनी सर्व सदस्यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांचे आभार मानत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा केली. शासकीय असो किंवा अशासकीय, या निर्णयामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदात आणि उत्साहात साजरी होणार आहे.