सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:56 IST

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळांसह नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आमच्या आहेत, मग अर्थखातेही आम्हाला परत मिळायला हवे, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतली आहे.

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळांसह नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीतल्या घडामोडींमुळे वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यातही महायुतीमधील मित्रपक्षच आपापसांत भिडू लागले आहेत. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यातली धुसफूस उघड दिसू लागली आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकाटिपण्णी करत आहेत. अशा वेळी भाजपची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले होते. हेच खाते परत मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आता फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे इतर नेतेही होते.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे अर्थखातेही पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवार आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे, असे त्यांनी सांगितले. हे खाते आमचे हक्काचे आहे, आणि ते परत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली, असेही भुजबळ म्हणाले.

अर्थखात्याच्या मागणीवर बोलताना भुजबळ यांनी असा दावा केला की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे या विषयावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसबरोबर असतानाही खातेवाटपात असे बदल झाले होते, एका खात्याऐवजी दुसरे खाते मिळाल्याची उदाहरणे आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनापूर्वी अर्थखात्याबाबत निर्णय होऊ शकतो, अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. इतर खात्यांची अदलाबदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आता राष्ट्रवादीच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की फडणवीस ते स्वतःकडेच ठेवणार, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ