सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

वरोरा येथे नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनाचे ध्वजारोहण

जय हिंद सैनिक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने वरोऱ्यातील शहीद योगेश डाहुले चौकात आझाद हिंद सेनेचा ८३ वा स्थापना दिन साजरा केला.

वरोरा येथे नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनाचे ध्वजारोहण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जय हिंद सैनिक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने वरोरा येथील शहीद योगेश डाहुले चौकात आझाद हिंद सेनेचा ८३ वा वर्धापन दिन साजरा केला. वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही त्याच होत्या.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ध्वजारोहणानंतर नेताजींना मानवंदना देण्यात आली आणि राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

व्यासपीठावर माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे, माजी सैनिक मनोज जीवतोडे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. संदीप पारखी आणि जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात अर्चना ठाकरे यांनी नेताजींची जाज्वल्य देशभक्ती आणि संघर्षमय जीवनकार्य यांचा आढावा घेतला. नेताजींच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले, असे त्या म्हणाल्या. त्यांचे शौर्य, त्याग आणि देशाप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुण पिढीलाही प्रेरणा देणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. "आझाद हिंद सेनेच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा सन्मान जय हिंद सैनिक संस्थेच्या माध्यमातून मला मिळाला, हे माझे सौभाग्य आहे. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही," अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

लेफ्टनंट डॉ. संदीप पारखी यांनी नेताजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!" ही नेताजींची घोषणा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे आवाहन होते, असे ते म्हणाले. त्या हाकेला प्रतिसाद देऊन आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा भारतीय इतिहासात कायम अजरामर राहील, असेही त्यांनी सांगितले. नेताजींच्या विचारांची आठवण करून देणारा आणि नव्या पिढीत देशभक्ती जागवणारा संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे नमूद करून त्यांनी संस्थेवर रचलेली कविताही वाचून दाखवली.

माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे यांनी सांगितले की, जय हिंद सैनिक संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा आहे. देशभक्तीची भावना अधिक पक्की करण्यासाठी असे कार्यक्रम व्हायला हवेत, असे ते म्हणाले. आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात राजेंद्र मर्दाने यांनी स्थापना दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. "आजचा दिवस केवळ एका ऐतिहासिक संघटनेच्या स्थापनेचा दिवस नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या वीरांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशभक्तीची आठवण करून देणारा दिवस आहे," असे ते म्हणाले.

यावेळी मर्दाने यांनी संस्थेच्या काही मागण्याही मांडल्या. टोकियो येथील रेनकोजी बौद्ध विहारात नेताजींच्या अस्थी असल्याचे सांगितले जाते. त्या अस्थी खऱ्या आहेत का, हे तपासण्यासाठी भारत सरकारने त्या भारतात आणून त्यांची डीएनए चाचणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. नेताजींची जयंती सर्व शाळा आणि महाविद्यालयांत साजरी करणे बंधनकारक करावे, अशीही मागणी त्यांनी केली. शिवाय २१ ऑक्टोबर हा आझाद हिंद सेनेचा स्थापना दिन दरवर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा व्हावा, असेही त्यांनी म्हटले.

कार्यक्रमात नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, माजी सैनिक मनोज जीवतोडे, सुरेश बोभाटे आणि लेफ्टनंट डॉ. संदीप पारखी यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सत्कार झाला. त्यांत माजी प्राचार्य बळवंत शेलवटकर, विजय पिसे, माजी शिक्षक लक्ष्मण पराते, शेतकरी किशोर देवडे, सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख, बंडू देऊळकर, राहुल देवडे, उद्योजक मधुसूदन टिपले, तुळशीदास लांजेवार आणि व्यावसायिक सतीश सारडा यांचा समावेश होता.

संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक चंद्रमोहन बोस, राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने आणि राष्ट्रीय सचिव जनार्दन जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले, तर संस्थेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पोहाणे यांनी आभार मानले. जिल्हा उपाध्यक्ष सागर कोहळे, पदाधिकारी विजय वैद्य, गजानन उमरे, अशोक बावणे, सामाजिक कार्यकर्ते संजू राम, तुषार मर्दाने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ