वरोऱ्यात दसऱ्याचे रावण दहन बंद करा, आदिवासी 'सगा' समाजाची पोलिसांकडे मागणी
इन्स्टाग्रामवर रावण दहनाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी करत समस्त आदिवासी 'सगा' समाजाने वरोरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वरोरा (चंद्रपूर) येथे दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहनावर बंदी घालावी, अशी मागणी करत समस्त आदिवासी 'सगा' समाजाने वरोरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. रावण दहनामुळे धार्मिक भावना दुखावतात, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनानुसार, जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणारा, निसर्गाची पूजा करणारा आदिवासी समाज महात्मा राजा रावण यांना आपले आराध्य दैवत मानतो. विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते आणि त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या जात आहेत, असे समाजाचे म्हणणे आहे. या गंभीर मुद्द्यावर वरोरा तालुक्यात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आहे. दसऱ्याला होणाऱ्या रावण दहनावर पूर्णपणे बंदी घालावी, ही या निवेदनातली प्रमुख मागणी आहे.
निवेदनात इन्स्टाग्रामचाही उल्लेख आहे. काही समाजकंटकांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली आणि वरोऱ्यात रावण दहन जल्लोषात होणार असल्याची पोस्ट व्हायरल केली, असे त्यात म्हटले आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून रावण दहनाच्या विरोधात आदिवासी समाजाने राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, असेही यात सांगण्यात आले आहे. अनेक शहरांमध्ये आता रावण दहन बंदही करण्यात आले आहे. असे असतानाच वरोऱ्यातील ही पोस्ट समोर आली, असा निवेदनाचा सूर आहे.
प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती पावले उचलली नाहीत आणि तालुक्यात कुठेही महात्मा राजा रावण यांचे दहन झाले, तर समस्त आदिवासी 'सगा' समाज तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा सज्जड इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानंतर दोन समाजांमध्ये कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण झाली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्टपणे लिहिले आहे.
निवेदन देताना बाळूभाऊ गेडाम, ज्येष्ठ आदिवासी नेते आणि पंचायत समितीचे माजी सदस्य चिंतामणजी आत्राम, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, साहित्यिक दत्तात्रय गावंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धानोरकर यांच्यासह आनंद गेडाम, सतीश गेडाम, सूरज पेंदोर, मनोज पेंदोर आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेमुळे वरोरा परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.