आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी तिकिटांची झुंबड; 12 दिवसांत 1.5 कोटींहून अधिक अर्ज
आयसीसी पुरुष एकदिवसीय वर्ल्डकप 2027 च्या तिकिटांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत जगभरातून 1.5 कोटींहून अधिक अर्ज आले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी पुरुष एकदिवसीय वर्ल्डकप 2027 बाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे. चाहत्यांनी तिकिटांसाठी आतापासूनच गर्दी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे की, तिकिटांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांच्या आतच जगभरातून 1.5 कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
हे अर्ज तब्बल 142 वेगवेगळ्या देशांमधून क्रिकेटप्रेमींनी केले आहेत. मोजक्याच दिवसांत मिळालेल्या या अफाट प्रतिसादाने मागील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत, असे समोर आलेल्या माहितीत म्हटले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अर्जांना आणि चाहत्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी आयसीसीने अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक तिकीट सिस्टिम सुरू केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता पूर्ण व्हेरीफीकेशन करूनच तिकीट दिले जाणार आहे, म्हणजेच तिकीट देण्याआधी अर्जांची पूर्ण पडताळणी होईल.
ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे येथे होणार आहे. आयसीसीने नुकतेच एक मोठा कार्यक्रम घेत स्पर्धेचे वेळापत्रक आणि पूर्ण नियोजन जाहीर केले आहे. वर्ल्डकप 2 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होणार आहे, तर 21 नोव्हेंबर 2027 रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
तिकिटांसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2026 असणार आहे. त्यामुळे 21 तारखेनंतर नोंदणी करता येणार नाही, म्हणजेच ज्यांना तिकीट हवे आहे, त्यांना त्या तारखेपर्यंतच नोंदणी करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचा हा सोहळा रंगणार आहे.
भारतीय संघात कोणाची वर्णी लागणार, याबद्दलही चर्चा सुरू आहे. प्लेइंग इलेव्हनबाबत विचार करता रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांची जागा पक्की आहे. तसेच बॅकअपच्या रूपात यशस्वी जयस्वालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याने फलंदाजीत चौथ्या क्रमांकावरील जागा निश्चित केली आहे. या फलंदाजी क्रमवारीत श्रेयसचा दांडगा अनुभव आहे.
वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी व हार्दिक पंड्या या दोघांनी विश्वचषक पथकातील आपली जागा पक्की केली आहे. तसेच फिरकीपटूंच्या रूपात रविंद्र जडेजा विश्वचषक खेळू शकतो. वॉशिंग्टन सुंदरला बॅकअप अष्टपैलूच्या रूपात आफ्रिकेसाठी संघात जागा मिळेल.
भारताचा संभाव्य स्क्वॉड असा असू शकतो: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.