वर्धा जिल्ह्यात दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर ३९ तक्रारी, सर्वांचे निराकरण
वर्धा जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर आतापर्यंत ३९ तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक शाळा, कॉलेज, मुलींची आणि महिलांची वसतिगृहे, बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, प्रेक्षणीय स्थळे, खाजगी क्लासेस आणि मोकळी मैदाने अशा ठिकाणी भेट देते. महिला आणि मुलींना मदत लागली तर पथक तिथे हजर असते.
महिला आणि मुलींना सोयीचे व्हावे आणि त्यांची तक्रार गोपनीय राहावी, म्हणून पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नवी दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पथकाकडून मिळणारी ही सर्व मदत या हेल्पलाईनमार्फत महिलांपर्यंत पोहोचवली जाते. यासाठी ३१.०८.२०२६ रोजी जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी आणि पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे उद्घाटन झाले होते.
हेल्पलाईन सुरू झाल्यापासून ३९ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्या सर्वांचे निराकरण करण्यात आले आहे. या तक्रारींमध्ये महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, महिला सुरक्षा, जेष्ठ नागरिक तसेच इतर प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.
२४.०९.२०२६ रोजी दामिनी हेल्पलाईनवर एक कॉल आला. त्या कॉलनंतर दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले, पीडितेला मदत केली आणि तिला तिच्या पालकांसह पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन रामनगर येथे नेले. या प्रकरणात तक्रारदाराच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेल्पलाईनवर आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेतली जाते आणि त्या संबंधित पोलीस स्टेशनला पाठवल्या जातात. त्या तक्रारींवरून दखलपात्र किंवा अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे नोंदवले जात आहेत. इतकेच नाही, तर तक्रारींचा पाठपुरावाही घेतला जातो.
वर्धा शहरातील नागरिकांनी शहरातील काही परिसरात आणि कोचिंग क्लासेसच्या बाहेरील परिसरात पोलीस गस्त वाढवण्याबाबत कॉल केले होते. हे कॉल आल्यानंतर दामिनी पथक आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार त्या ठिकाणी अधिक प्रभावीपणे गस्त घालत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील सर्व शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थिनींनी संकटाच्या वेळी दामिनी व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक ७६२०५२००२५ चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही सुरक्षित वाटत नसेल तर हेल्पलाईनवर एक व्हॉट्सअप मॅसेज करून सविस्तर माहिती द्यावी, म्हणजे मदत करता येईल, असे सपोनि माधुरी वाघाडे, भरोसा सेल आणि दामिनी पथक प्रमुख यांनी सांगितले.