शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वनपुरीच्या भैरवनाथ प्रतिष्ठानने पुरंदर उपसाचे पाणी स्वखर्चाने तलाव, बंधाऱ्यात सोडले

वनपुरीच्या भैरवनाथ प्रतिष्ठानने पुरंदर उपसाचे पाणी स्वखर्चाने तलाव, बंधाऱ्यात सोडले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

पुरंदर तालुक्यात ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाई जाणवू लागली असताना, वनपुरी येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठानने शेतकऱ्यांसाठी गावतळे आणि बंधारे मोफत भरून दिले.

सासवड : यंदा पावसाळ्यात पाऊस मनासारखा झाला नाही. त्यामुळे पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती तयार झाली असून, ऑक्टोबर महिन्यातच शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. उभ्या पिकांचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे आणि पिके वाचविण्यासाठी त्यांची आतापासूनच धडपड सुरू झाली आहे.

अशा वेळी वनपुरी येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठान शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. सामाजिक कामात पुढाकार घेणाऱ्या या प्रतिष्ठानने पुरंदर उपसाच्या पाण्यातून गावच्या परिसरातील गावतळे, बंधारे आणि ओढे मोफत भरून दिले. यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.

यंदाचा खरीप हंगाम कसाबसा पार पडला असून आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची पेरणी आधीच झाली आहे. हरभरा, गहू या मुख्य पिकांसह इतर पिकांची पेरणी सुरू आहे. ठिकठिकाणी कांदा लागवडही चालू असल्याचे दिसते. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने जनावरे पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे, म्हणून जनावरांच्या चाऱ्याची लागवडही शेतकरी करत आहेत. एकीकडे शेतीच्या कामांची गडबड सुरू असताना दुसरीकडे पाणीटंचाईमुळे सगळ्यांचेच धाबे दणाणले आहे.

शेतातील उभी पिके जगविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतो. विहिरींनी आतापासूनच तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिकांचे भवितव्य काय, पाणीच मिळाले नाही तर पिके कशी येणार, पुढचे वर्षभर जनावरांना चारा कुठून आणायचा आणि वर्षभराचे धान्य कुठून आणायचे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.

श्री भैरवनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देण्यासाठी तसेच सवलती आणि अनुदान मिळण्यासाठी मदत केली जाते. प्रतिष्ठान दरवर्षी नवरात्र उत्सवात मुळशी तालुक्यातील शिरकोली येथे शिरकाई देवीच्या दर्शनासाठी यात्रा आयोजित करते. नेहमीप्रमाणे यंदाही गावातील लोकांना देवीच्या दर्शनाची ओढ लागली होती. पण शेतकऱ्यांची अडचण आणि पिकांची दुर्दशा पाहून देवदर्शन पुढच्या वर्षी करता येईल, उभी पिके वाचविणे जास्त महत्त्वाचे आहे, असे ठरवून प्रतिष्ठानने त्यालाच प्राधान्य दिले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष राजाभाऊ कुंभारकर यांनी यंदा देवदर्शनाला न जाता पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून स्वखर्चाने शेतीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. संचालिका वसुंधरा कुंभारकर, तसेच प्रतिष्ठानचे सोमनाथ कुंभारकर, महेश मगर, माणिक कुंभारकर, तुकाराम महामुनी, शांताराम कुंभारकर, संतोष कुंभारकर, माऊली कुंभारकर, शरद कुंभारकर, सुनिल कुंभारकर, ज्ञानदेव खेडेकर, किरण कुंभारकर आणि इतर सदस्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सदस्यांनी योजनेच्या कार्यालयात पैसे भरून वनपुरी येथील गाव तलाव, शेरीचा मळा येथील बंधारा आणि परिसरातील तलाव पाण्याने भरून घेतले. तलाव भरल्यावर सर्वांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले.

यंदा पाण्याची टंचाई खूप आहे. पिकांचे भवितव्य, जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाणी हे मोठे प्रश्न आहेत. पुढचे काही महिने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करायचे ठरवले, असे सांगण्यात आले. या पाण्यामुळे पिकांना थोडाफार आधार मिळेल आणि परिसरातील विहिरी व बोअरची पाणीपातळी राखायला मदत होईल. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास काही दिवसांनी पुन्हा पाणी दिले जाईल.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ