सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 18:13 IST

पानवडीत वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने खून, जनावरे नेण्यावरून झालेल्या वादाचा राग

पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात रत्नमाला आणि मोहन धिवार या वृद्ध पती-पत्नीचा खून झाला असून, सासवड पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या गणेश धिवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पानवडीत वृद्ध दाम्पत्याचा धारदार शस्त्राने खून, जनावरे नेण्यावरून झालेल्या वादाचा राग छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात गुन्हेगारी वाढली असून, अशातच पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात एका वृद्ध पती-पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) अशी मृतांची नावे आहेत.

या प्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी अमर खरात (वय ३४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सासवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश धिवार हा मृत मोहन धिवार यांच्या घराशेजारीच राहतो. त्यांच्यात काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. घरासमोरून जनावरे नेण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी भावकीतील शेजाऱ्यांशी भांडणे झाली होती. फिर्यादीच्या दारासमोरून गायी आणि बैल नेत असताना त्यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरूनच आरोपीने रत्नमाला आणि मोहन धिवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजता घडली. वृद्ध दाम्पत्य आपल्या घराकडे निघालेले असताना घराच्या अंगणात आधीपासून तयारीत असलेल्या आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. दोघांनाही जबर मार लागून खूप रक्तस्त्राव झाला. त्यातच रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मृत धिवार पती-पत्नी आणि आरोपी गणेश धिवार हे एकाच भावकीतील आहेत. आरोपीचे कुटुंब गेल्या दोन ते तीन पिढ्यांपासून रोजगारानिमित्त बाहेरगावी राहत आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटून आला होता. त्याला पुन्हा तडीपार करण्यात आल्याने तो मूळ गावी राहायला आला होता. मात्र त्याच्या प्रवृत्तीमुळे निष्पाप वृद्ध दाम्पत्याचा जीव गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ