सासवडमध्ये गाडी आडवी लावल्याचा जाब विचारला म्हणून वकील, पत्नीला बेदम मारहाण
सासवडमध्ये हॉस्पिटलसमोर रस्ता अडवणाऱ्या गाडीबद्दल जाब विचारल्याने १० ते १२ जणांच्या टोळक्याने वकील आणि त्यांच्या पत्नीला भरदिवसा मारहाण केली.
सासवडमध्ये एका हॉस्पिटलसमोर चारचाकी गाडी आडवी लावून रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका वकिलासह त्यांच्या पत्नीला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. भर वर्दळीच्या रस्त्यावर, तेही भरदिवसा हा प्रकार घडल्याने सासवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सासवड बार असोशिएशनने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेत सासवड बार असोशिएशनचे सदस्य अॅड प्रतिक महेंद्र बसाळे आणि त्यांच्या पत्नी प्रांजली प्रतिक बसाळे यांना मारहाण झाली. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी प्रथमेश ज्ञानेश्वर काळे, समिर उत्तम काळे आणि हरिश जगदाळे (सर्वजण रा. काळेवाडी, ता. पुरंदर) यांच्यासह अन्य ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड प्रतिक बसाळे यांचे आईवडील सासवडमध्ये डॉक्टर असून त्यांचे सोपाननगर रस्त्यावर प्रसिद्ध बसाळे हॉस्पिटल आहे. रविवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास प्रतिक बसाळे पत्नीसह हॉस्पिटलमध्ये जात होते, त्याचवेळी आरोपी प्रथमेश काळे यांनी किया कंपनीची पांढऱ्या रंगाची सेल्टॉस गाडी (नंबर एमएच १२ वायएक्स ७४७४) रस्त्याच्या मधोमध लावून रस्ता अडवला होता. गाडी अशी मधोमध लावून रस्ता का बंद केला, असे प्रतिक बसाळे यांनी विचारले.
यावर आरोपी प्रथमेश काळे यांनी गाडी बाजूला न घेता फिर्यादीशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर प्रथमेश काळे, समिर काळे, हरिश जगदाळे यांच्यासह अन्य ८ ते १० जणांचे टोळके अंगावर धावून आले आणि शिवीगाळ करत प्रतिक बसाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. भांडण सोडवायला आलेले प्रतिक यांचे वडील डॉ. महेंद्र बसाळे यांनाही आरोपींनी जोरदार मारहाण केली. तर फिर्यादी महिलेशी अश्लील हातवारे व इशारे करत, तिच्या शरीराला हात लावून लज्जा वाटेल असे वर्तन करत विनयभंग करण्यात आला.
वर्दळीच्या रस्त्यावर भर दुपारी हा प्रकार घडल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. सोशल मीडियावरही या घटनेची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा रंगली. तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप सासवडमधील नागरिकांनी केला आहे.
सासवड बार असोशिएशनने वकील मारहाण प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. असोशिएशनने तातडीने बैठक घेत सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी बारच्या अध्यक्षा अॅड भारती जगताप, उपाध्यक्षा अॅड सरला तिवारी, सचिव ललिता झेंडे, सहसचिव श्वेता कुंजीर, खजिनदार सानिया मणियार, करिष्मा डांगे तसेच पुरंदर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप यांच्यासह असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.