सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणी; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, रहिवाशांना खोकला, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात सध्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे दोन ते तीन दिवसांआड नळाला पाणी येते. तेही अतिशय गढूळ आणि घाण वासाचे असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाण्याचा वापर केल्यानंतर काही जणांना खोकला, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. काही नागरिकांना घशाचा त्रास होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहिला असून, सुभाष टेकडी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीबरोबरच संतापाचेही वातावरण आहे.
या परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने बसवलेल्या बोअरवेलची दुरवस्था झाली आहे आणि पाणीपुरवठाही नियमित होत नाही. त्यामुळे प्यायच्या पाण्यासाठी लोकांना इकडे तिकडे भटकावे लागते. दोन-तीन दिवसांनी नळाला पाणी आले, की ते साठवून ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहत नाही. पण नळाने येणारे पाणी गढूळ रंगाचे असून त्याला प्रचंड दुर्गंधी येते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, पाणी उकळून घेतले तरी त्याची दुर्गंधी जात नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. तरीही असेच पाणी वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, आणि त्यामुळेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकारावर समाजसेवक संजय वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सुभाष टेकडी परिसरात येणारे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी तर सोडाच, घरगुती वापरासाठीदेखील योग्य नाही. या पाण्याला सडलेल्या माशासारखा भयंकर वास येत आहे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
वाघमारे यांनी अशी मागणी केली आहे की, महानगरपालिकेने सुभाष टेकडी परिसरातील पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करावी आणि पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत. महापालिकेने हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संजय वाघमारे यांनी दिला आहे.
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की काही तांत्रिक कारणांमुळे दूषित पाणी येत आहे. या संदर्भात एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.