उजनीतल्या AI डेटा सेंटरवरून सोलापुरात वाद, देवेंद्र कोठे यांची रोहित पवारांवर टीका
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उजनी जलाशयातील प्रस्तावित AI डेटा सेंटरला रोहित पवार यांचा विरोध आहे, तर भाजपने समर्थनार्थ आंदोलन केलं. आंदोलनात आमदार देवेंद्र कोठे यांनी पवार यांच्यावर टीका केली.
राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच कारणांनी वातावरण गरम झाल्याचं दिसत आहे. आधी SIR विरोधी आंदोलनं आणि पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन यांसारख्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण चिघळलेलं असतानाच, विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधरच्या निवडणुकीवरूनही जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत होती. आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
उजनी जलाशयात उभारल्या जाणाऱ्या AI डेटा सेंटरवरून सोलापूर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे भाजपने मात्र प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी रोहित पवारांवर जोरदार शब्दांत टीका केली. "रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा असून ते शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग घेत आहेत," असं कोठे म्हणाले.
उजनीतल्या प्रस्तावित AI डेटा सेंटरमुळे सोलापुरात दोन गट पडल्याचं चित्र आहे. एका बाजूला प्रकल्पाला विरोध होत असताना भाजपने विकासाच्या मुद्द्यावरून समर्थनाची भूमिका घेतली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली. आंदोलनात रोहित पवार यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कोठे यांनी रोहित पवारांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. रोहित पवार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नसून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी आंदोलन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. "रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. लबाड लांडग्यासारखं ढोंग करून शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग घेत आहेत," अशा शब्दांत कोठे यांनी निशाणा साधला.
सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही कोठे यांनी रोहित पवारांना सुनावलं. "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" अशी म्हण वापरत त्यांनी रोहित पवार बाहेरच्या जिल्ह्यातले असल्याचं सांगितलं. सोलापूरच्या विकास प्रकल्पांमध्ये हस्तक्षेप करू नका, असंही कोठे म्हणाले.
डेटा सेंटरच्या समर्थनात भूमिका मांडताना कोठे यांनी दावा केला की, या प्रकल्पामुळे ४० ते ४२ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. तसंच प्रकल्पातील सोलर पॅनलचा वाटा फक्त ९ टक्के असल्याने मासेमारीचं नुकसान होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उजनी जलाशयातील या प्रकल्पावरून शेतकरी, स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतरं वाढताना दिसत आहेत. भाजपचा विकासाचा दावा आणि रोहित पवारांचा विरोध यामुळे येत्या काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.