सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

ठाणे मेट्रो: मेट्रोचे डबे अखेर रुळांवर चढवण्याची मोहीम सुरू, मॉडेल चेकनाका परिसरात रात्री वाहतुकीत बदल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-4 मार्गिकेवर डबे रुळांवर चढवण्याचे काम सुरू झाले असून, त्यासाठी 21 ऑक्टोबरपासून रात्रीच्या वेळी वाहतूक बदल लागू झाले आहेत.

ठाणे मेट्रो: मेट्रोचे डबे अखेर रुळांवर चढवण्याची मोहीम सुरू, मॉडेल चेकनाका परिसरात रात्री वाहतुकीत बदल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ठाणेकरांना ज्या मेट्रो प्रवासाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे, तो प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) 'वडाळा-घाटकोपर-कासारवडवली' या मेट्रो-4 मार्गिकेवर सध्या वेगाने काम करत आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून 'मॉडेल चेकनाका ते तीन हात नाका' या टप्प्यात मेट्रोचे डबे प्रत्यक्ष रुळांवर चढवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या कामामुळे या परिसरातील वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ठाण्यात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मेट्रो-4 आणि मेट्रो-4 अ च्या मार्गिकेवर चाचणी (ट्रायल रन) झाली होती. मात्र त्यानंतर कामाचा वेग मंदावल्याने नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त होत होती. अलीकडेच काही पक्षांनी या मुद्द्यावरून आंदोलनेही केली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्रकल्पाला गती दिली आहे.

डबे रुळांवर चढवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रकल्पाच्या अंतिम चाचण्या आणि पूर्ततेच्या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे. ठाणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांवर लोकल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा जो ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही मेट्रो अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

डबे सुरक्षितपणे रुळांवर पोहोचवण्यासाठी मॉडेल चेकनाका परिसरातील भारत पेट्रोल पंपाजवळच्या भागात विशेष यंत्रसामग्री वापरली जाणार आहे. प्रवाशांना आणि वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांच्या परवानगीने बुधवारी (21 ऑक्टोबर 2026) रात्रीपासून रात्रीच्या सत्रात वाहतूक बदल लागू झाले आहेत.

हे बदल 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर आणि त्यानंतर 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत लागू राहतील. वेळ दररोज रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आहे.

पर्यायी व्यवस्थेनुसार, मुंबई आणि वागळे इस्टेटहून मार्ग क्रमांक 16 ने मॉडेल चेकनाक्यामार्गे तीन हात नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना त्या ठिकाणी प्रवेशबंदी असेल. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी विरुद्ध दिशेच्या मार्गावर एक अतिरिक्त वाहिनी तयार करण्यात आली आहे. वाहनांची वाहतूक याच पर्यायी मार्गिकेतून वळवण्यात आली आहे.

डिसेंबरपर्यंत ठाण्यातील काही निवडक स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ठाणे-मुंबई प्रवास आणखी सुकर होणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ