सुझुकीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'ई-स्काय' जपानमध्ये दाखल, एकदा चार्ज केल्यावर 310 किमी
सुझुकीने आपली आजवरची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार 'ई-स्काय' जपानी बाजारात आणली आहे. तिची विक्री 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात सुझुकी कंपनीने थोडे उशिराने पाऊल ठेवले आहे. आता मात्र कंपनीने आपली आजवरची सर्वात स्वस्त आणि आकर्षक इलेक्ट्रिक कार 'ई-स्काय' (e-Sky) अधिकृतपणे लॉन्च केली आहे. ही 'केई कार' (Kei Car) जपानच्या बाजारात आली असून बजेटमध्ये बसणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये खळबळ माजवण्यासाठी ती सज्ज आहे. चायनीज कंपनी बीवायडीच्या (BYD) टेक्नोलॉजीचा वापर करून सुझुकीने ही कार किफायतशीर किंमतीत बाजारात आणली आहे.
जपानमध्ये 'ई-स्काय'ची विक्री येत्या 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. कंपनीने ही कार ए (A), जी (G) आणि एक्स (X) अशा तीन व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे.
बेस व्हेरियंट (A) ची किंमत 21.2 लाख जपानी येन ठेवण्यात आली आहे, म्हणजेच अंदाजे 13 लाख रुपये. हा मॉडेल बिल्ट-टू-ऑर्डर पद्धतीने मिळेल. मिड व्हेरियंट (G) ची किंमत 23.9 लाख येन आहे, अंदाजे 14.6 लाख रुपये. टॉप व्हेरियंट (X) साठी 27.9 लाख येन मोजावे लागतील, अंदाजे 17 लाख रुपये.
जपानमधील सरकारी इलेक्ट्रिक वाहन सब्सिडीचा (CEV Subsidy) लाभ घेतला, तर कारची प्रभावी किंमत आणखी कमी होऊन सुमारे 9.4 लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सुझुकीने दरमहा किमान 1 हजार कार विकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची बॅटरी. सुझुकीने यात चायनीज ऑटोमेकर BYD ची LFP (लिथियम आयन फॉस्फेट) बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी 26 kWh क्षमतेची असून सुझुकीच्या खास 'HEARTECT-e' प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. वजनाने हलकी असलेली ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 310 किलोमीटर (WLTC क्लेम्ड) धावू शकते.
कारचा ऊर्जा वापर अतिशय कमी, म्हणजे 97 Wh/km इतका आहे. तिला 50 kW चा डीसी फास्ट चार्जर मिळतो, त्यामुळे चार्जिंग सोपे होते. चीनच्या BYD Racco कारच्या तुलनेत ही कार कमी बॅटरी आकारातही चांगली रेंज देते.
आकाराचा विचार केला तर 'ई-स्काय'ला 'टॉल बॉय' लूक देण्यात आला आहे. तिची लांबी 3395 मिमी, रुंदी 1475 मिमी आणि उंची 1625 मिमी आहे, तर व्हीलबेस 2460 मिमीचा आहे. कारचे वजन केवळ 1030 किलो आहे.
इंटेरियरमध्ये 10.1 इंचाची सेंट्रल टचस्क्रीन सिस्टम, ड्रायव्हर डिस्प्ले, पुश स्टार्ट बटण आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशा सुविधा ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत.
जपानच्या बाजारानंतर ही कार 2027 पर्यंत यूके आणि युरोपियन मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय बाजारात ही कार कधी येणार, याबद्दल कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.