जिओचा स्वस्त AI चष्मा येतोय: QR स्कॅन करून पेमेंट, 12 भाषांत भाषांतर
रिलायन्स जिओ JioFrames नावाचा पहिला AI स्मार्ट चष्मा बाजारात आणत आहे. त्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रिलायन्स जिओ आता चष्म्याच्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला पहिला AI स्मार्ट चष्मा लवकरच बाजारात आणणार असून त्याला Jio AI Glasses किंवा JioFrames असं नाव आहे. मोबाईल आणि इंटरनेट स्वस्त करून जिओने जशी क्रांती केली होती, तशीच क्रांती आता चष्म्यांच्या दुनियेत होईल, असं सांगितलं जात आहे.
नुकत्याच झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये जिओने या चष्म्याची झलक दाखवली. हा चष्मा बघायला साध्या चष्म्यासारखाच आहे आणि वजनाला एकदम हलका आहे. मात्र आतमध्ये जिओने स्वतःची टेक्नॉलॉजी बसवली आहे. त्यासाठी कंपनीने JioRealityOS नावाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली आहे.
कंपनीने या चष्म्याचे दोन प्रकार आणले आहेत. पहिला प्रकार आहे ऑडिओ फ्रेम्स. यात फक्त स्पीकर आणि माईक असेल. त्यातून गाणी ऐकता येतील आणि कॉलवर बोलता येईल. दुसरा मुख्य मॉडेल म्हणजे स्मार्ट कॅमेरा फ्रेम्स. यात HD कॅमेरा आणि व्हिज्युअल इंटेलिजन्स सेन्सर दिला आहे.
या चष्म्याचं एक फीचर म्हणजे आवाजावर सुरू होणं. चष्म्याला हात लावायची गरज नाही. फक्त "Hello Jio" असं म्हटलं की तो सुरू होतो. त्यानंतर गूगल सर्चपासून हवामानापर्यंत काहीही विचारलं तर माहिती मिळते.
सगळ्यात मोठं फीचर आहे पेमेंटचं. दुकानात गेल्यावर खिशातून फोन काढायची गरज नाही. चष्म्यातून दुकानाच्या UPI QR कोडकडे बघितलं की चष्म्यातला कॅमेरा तो कोड स्कॅन करतो. JioFrames मधून 5000 रुपयांपर्यंतचं पेमेंट करता येईल आणि तेही फोनला हात न लावता.
भाषांतराचीही सोय आहे. बाहेर फिरायला गेल्यावर एखादा बोर्ड समजला नाही, तर चष्मा त्या बोर्डकडे बघून AI च्या मदतीने त्याचं भाषांतर करतो आणि थेट कानात मराठीत किंवा हिंदीत सांगतो. एकूण 12 भारतीय भाषांना तो सपोर्ट करतो.
बाईकवर असताना रस्ता शोधायचा असेल तर चष्मा कानातच दिशा सांगेल, त्यामुळे हातात फोन धरावा लागणार नाही. शिवाय यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर्स या चष्म्यातूनच थेट इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर लाईव्ह जाऊ शकतात.
किमतीबद्दल सांगायचं तर सध्या बाजारात Meta आणि Ray-Ban चा चष्मा आहे आणि त्याची किंमत 30 हजारांच्या वर आहे. जिओ आपला चष्मा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणणार आहे, अशी माहिती आहे. टेक एक्सपर्ट्सच्या मते हा चष्मा याच वर्षाच्या शेवटी, म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये लॉन्च होईल. तो 10 हजारांच्या आत आला, तर भारतात वियरेबल गॅजेट्सची नवी क्रांती सुरू होईल, असंही सांगितलं जात आहे.