बीवायडी भारतात आणणार डेंजा ब्रँड; Z9 GT आणि D9 या दोन इलेक्ट्रिक गाड्यांची तयारी
चीनची इलेक्ट्रिक कार कंपनी बीवायडीने भारतात डेंजा या लग्जरी सब-ब्रँडची अधिकृत घोषणा केली आहे.
चीनमधील मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी बीवायडी (BYD) भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आणखी एक मोठी एंट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारतात आपल्या 'डेंजा' (Denza) या लग्जरी सब-ब्रँडची अधिकृत घोषणा केली आहे. या ब्रँडचे टीझरही रिलीज करण्यात आले आहेत.
सुरुवातीला या ब्रँडखाली दोन अत्याधुनिक आणि प्रीमियम इलेक्ट्रिक गाड्या भारतीय बाजारात येऊ शकतात. या गाड्या कंपनीच्या नेहमीच्या शोरूमपेक्षा वेगळ्या, एलिट शोरूममधून विकल्या जाण्याची शक्यता आहे.
पहिली गाडी आहे डेंजा Z9 GT. ही हाय-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक फास्टबॅक कार आहे. तिच्यात तीन इलेक्ट्रिक मोटर्सचा सेटअप आहे, एक पुढे आणि दोन मागे. या मोटर्स मिळून 1140 hp पॉवर आणि 1210 Nm टॉर्क निर्माण करतात.
वेगाबद्दल सांगायचे तर ही कार 0 ते 100 किमी प्रति तास वेग अवघ्या 2.7 सेकंदात गाठू शकते. तिचा टॉप स्पीड 270 किमी प्रति तास आहे.
Z9 GT मध्ये 122.5 kWh ची मोठी बॅटरी आहे आणि WLTP नुसार तिची रेंज सुमारे 600 किमी आहे. डेंजाच्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीमुळे योग्य चार्जर मिळाला तर ही कार अवघ्या 9 मिनिटांत 10 ते 97 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. या कारमध्ये रियर-व्हील स्टीअरिंग आणि 'क्रॅब-क्रॉल' फंक्शनही आहे, त्यामुळे गाडी बाजूच्या दिशेनेही हलवता येते.
दुसरी गाडी आहे डेंजा D9. ही पूर्णपणे लक्झरियस 7 सीटर एमपीव्ही (MPV) असून, विशेषतः शॉफर-ड्रिव्हन (Chauffeur-driven) ग्राहकांसाठी डिझाईन केली आहे. तिच्यात 103 kWh ची 'ब्लेड' बॅटरी आहे आणि एका चार्जवर जवळपास 520 किमी रेंज मिळते. ही गाडी 200 kW पर्यंतच्या डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
D9 मध्ये 2+2+3 सिटिंग लेआऊट आहे. दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीट्समध्ये इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंट, हिटिंग, व्हेंटिलेशन, मसाज आणि लेग रेस्ट असे उच्च दर्जाचे फीचर्स मिळतात.
किमतीबाबत सांगायचे तर या दोन्ही गाड्या सुरुवातीला CBU (Complete Built-Up Unit) मार्गाने भारतात आयात केल्या जाण्याची शक्यता आहे. Z9 GT ची किंमत सुमारे 1.2 कोटी ते 1.5 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. D9 ची किंमत सुमारे 80 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, अशी अपेक्षा आहे. भारतीय बाजारात ही गाडी प्रामुख्याने टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) आणि मर्सिडीजच्या काही मोठ्या गाड्यांना टक्कर देईल. या गाड्यांमुळे भारतातील लक्झरी ईव्ही सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार, यात शंका नाही.