स्टिक रन गेमचे निर्माते मॅन्युएल ओटो यांचे ३० व्या वर्षी निधन, ट्विच स्ट्रीमदरम्यान घटना
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जर्मन गेम डेव्हलपर मॅन्युएल ओटो यांचे वयाच्या ३० व्या वर्षी निधन झाले. २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ट्विचवरील थेट प्रक्षेपणादरम्यान त्यांनी कथितरीत्या आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
'स्टिक रन' (Stick Run) हा गेम बनवणारे जर्मन गेम डेव्हलपर मॅन्युएल ओटो (Manuel Otto) यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ट्विच (Twitch) या लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण सुरू असताना त्यांनी कथितरीत्या टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दक्षिण-पूर्व जर्मनीतील बावेरिया भागातल्या एका मालमत्तेला आग लागल्याचेही वृत्त आहे. गेमिंग आणि टेक जगताला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
ओटो यांचे पूर्ण नाव मार्क-मॅन्युएल अलेक्सायंडर ओटो (Marc-Manuel Alexander Otto) असे होते. 'स्टिक रन' गेमच्या अधिकृत सोशल मीडिया टीमने त्यांच्या निधनाला दुजोरा दिला. टीमने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले की, "आम्ही फक्त आमच्या गेमच्या निर्मात्यालाच नाही, तर गेमिंग कम्युनिटीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ गमावला आहे." लाखो लोकांच्या लहानपणीच्या आठवणी आणि डिजिटल संस्कृती या गेमशी जोडलेल्या होत्या.
२१ ऑक्टोबरला ओटो यांचा लाईव्ह प्रवाह चालू असतानाच ही गंभीर घटना घडल्याचे सांगितले जाते. त्या लाईव्ह स्ट्रीमची माहिती मिळताच प्लॅटफॉर्मच्या प्रशासनाने आणि डिजिटल सुरक्षा पथकाने लगेच पावले उचलली. ट्विचने तो व्हिडिओ आणि ओटो यांचे अधिकृत चॅनल प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे.
ट्विचच्या प्रवक्त्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आमच्या कम्युनिटीतील प्रत्येक सदस्याचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. हा व्हिडिओ डिजिटल मीडियावर पसरू नये म्हणून आम्ही ते चॅनल आणि व्हिडिओ लगेच काढून टाकला आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तींनी तातडीने समुपदेशन आणि मदत केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन आम्ही करतो."
दुसरीकडे, 'स्टिक रन' टीमने सर्व गेमर्स आणि सोशल मीडिया युजर्सना आवाहन केले आहे की, या दुर्दैवी घटनेबद्दल अफवा किंवा पडताळणी न झालेली माहिती पसरवू नका. दिवंगत ओटो यांच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या लोकांची गोपनीयता व भावना जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही टीमने म्हटले आहे.
ओटो यांचा जन्म १९९६ मध्ये जर्मनीत झाला. लहानपणापासून त्यांना संगणक, ॲनिमेशन आणि कोडिंगचे भारी वेड होते. २०१० मध्ये ते फक्त १४ वर्षांचे असताना त्यांनी 'स्टिक रन' हा साधा पण मजेदार मल्टीप्लेअर 2D रनर गेम बनवला. सुरुवातीला तो फक्त फेसबुकवर (Facebook) खेळता येत होता. त्या काळात 'फार्मव्हिल'सारख्या गेम्सची हवा होती, तरीही स्टिक रनने थोड्याच काळात स्वतःची वेगळी ओळख बनवली.
या गेममध्ये खेळाडू एका स्टिक फिगरला (Stick Figure) चालवत अडथळे पार करायचे, नाणी गोळा करायचे आणि सर्वोच्च स्कोअर गाठण्यासाठी मित्रांशी स्पर्धा करायचे. रिअल-टाइम मल्टीप्लेअर वैशिष्ट्यामुळे (Multiplayer Feature) जगभरातील कोट्यवधी युजर्स एकमेकांशी जोडले गेले. पुढच्या काही वर्षांत गेम इतका गाजला की फेसबुकनंतर तो अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) वरही आला. आकडेवारीनुसार, जगभरात ४३ दशलक्षांहून (४.३ कोटी) अधिक लोकांनी हा गेम खेळला आहे.
२०१३ मधील एका जुन्या मुलाखतीत ओटो यांनी सांगितले होते की, संगणकावर डिझायनिंग करण्याची आवड आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याची इच्छा, यातूनच त्यांना 'स्टिक रन' बनवण्याची प्रेरणा मिळाली. इतक्या लहान वयात मिळालेले त्यांचे यश अनेक तरुण गेम डेव्हलपर्ससाठी प्रेरणादायी ठरले होते.
ओटो यांच्या अचानक जाण्याने गेमिंग आणि टेक जगतात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. अनेक जुन्या खेळाडूंनी लहानपणीच्या आठवणी सांगत सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच वेळी, डिजिटल विश्वात काम करणारे कंटेंट क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स यांचे मानसिक आरोग्य (Mental Health) आणि त्यांच्यावरचा प्रचंड दबाव, याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.