बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

उल्कापिंडापासून चाकू घडवणारा फ्रान्समधील कारागीर चर्चेत; एका चाकूची किंमत ६.९ लाख रुपयांपर्यंत

उल्कापिंडापासून चाकू घडवणारा फ्रान्समधील कारागीर चर्चेत; एका चाकूची किंमत ६.९ लाख रुपयांपर्यंत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

फ्रान्समधील जोरीस डोमारेस्ट हा कलाकार आकाशातून पडलेल्या उल्कापिंडाच्या धातूपासून चाकू तयार करतो. एका चाकूची किंमत ५ हजार ते ६ हजार युरो आहे.

कोणाच्या डोक्यात कधी कोणती कल्पना येईल, हे सांगता येत नाही. आकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कापिंडापासून चाकू तयार करता येईल, ही कल्पना फ्रान्समधील जोरीस डोमारेस्ट या कलाकाराने आपल्या कलेतून प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे.

फ्रान्समधील युरे (Eure) प्रांतात राहणारा हा कारागीर पृथ्वीवर पडलेल्या उल्कापिंडांमध्ये आढळणाऱ्या धातूंचा वापर करून चाकू तयार करतो. उल्कापिंडामध्ये प्रामुख्याने लोखंड आणि निकेलसारखे धातू आढळतात. या धातूंना योग्य पद्धतीने आकार देऊन तो आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण चाकू घडवतो. प्रत्येक उल्कापिंडाची रचना वेगळी असते, म्हणून त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंनाही वेगळे स्वरूप मिळते.

त्याच्या हाताने तयार केलेल्या एका चाकूची किंमत तब्बल ५ हजार ते ६ हजार युरो आहे. म्हणजेच भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ५.३ ते ६.९ लाख रुपये होते. त्याच्या चाकूंच्या कलाकुसरीची भुरळ फ्रान्समधील लोकांवर पडत आहे.

ही किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तरीही अशा वस्तूंना विशेष संग्राहकांकडून आणि दुर्मिळ वस्तूंची आवड असलेल्या ग्राहकांकडून मागणी मिळते. या चाकूंचे वैशिष्ट्य केवळ त्यांचा वापर एवढेच नाही, तर त्यामागे असलेला अवकाशाचा इतिहास आणि कारागिराचे कौशल्य हेही आहे.

शौकीन लोक कलाकाराच्या कलेचा आदर म्हणून अशा वस्तू खरेदी करतात. त्याचबरोबर माणसाचे विचार बदलत असल्यामुळे अशा महागड्या आणि दुर्मिळ वस्तूचा मालक असणे हे श्रीमंतीचे सामाजिक प्रतीक म्हणूनही खरेदी केले जाते.

उल्कापिंडापासून वस्तू तयार करणे हे सामान्य लोहारकामापेक्षा अधिक आव्हानात्मक मानले जाते. धातूची रचना, त्याचे तापमान आणि घडणावळीची प्रक्रिया यांचा विशेष अभ्यास करावा लागतो. योग्य तंत्राचा वापर केला तरच त्याला अपेक्षित आकार देता येतो.

विशेष म्हणजे उल्कापिंडातील नैसर्गिक धातूंच्या रचनेमुळे तयार वस्तूंवर वेगळी नक्षी आणि पोत दिसू शकतो. त्यामुळे प्रत्येक चाकूला स्वतंत्र ओळख मिळते. विज्ञान, इतिहास आणि पारंपरिक कामगिरी यांचा संगम असलेली ही कला फ्रान्समध्ये लक्ष वेधून घेत आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ