टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे; दुष्काळात सरकार पाठीशी, शिंदेंची ग्वाही
टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात देवीच्या आगमन सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची ग्वाही दिली आणि मंडळांना बचतीतून मदतीचे आवाहन केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाण्यातील टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवात यंदा देवीसमोर बळीराजासाठी साकडे घालण्यात आले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली. या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
टेंभी नाका येथील 'श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा'च्या आई दुर्गेश्वरीचा आगमन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशे, लेझीम, टाळ मृदंग, कोळी नृत्य, गोंधळ नृत्य, आदिवासी तारपा नृत्य आणि इतर पारंपरिक कलाप्रकार सादर करत देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर टेंभी नाका येथील मंडपात विधिवत पूजन करून देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दुष्काळग्रस्त भागात केंद्राचे पथक पाहणी करून गेले आहे. त्याबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, असे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पूर्ण करण्यात आली असून सवलती आणि नुकसानभरपाईसोबतच संकटग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मुलींचे ठरलेले विवाह हा देखील गंभीर विषय आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी शिवसेनेने उचलली आहे, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील २५ हजार शेतकरी कुटुंबातील मुलींना सायकली आणि २५ हजार महिलांना शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. इतर मंडळांनीही अशाच प्रकारे काही बचत करून बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. "बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही," असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे यंदा हे ४८वे वर्ष आहे. यंदा देवभूमी उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ही देवी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पोलिसांच्या वतीने देवीला मानवंदना देण्यात आली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे पोलिसातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना राज्य संघटनप्रमुख आनंद परांजपे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, जॅकी भोईर, स्वानंद पवार, किरण नाकती, बाळा गवस, अमित जयस्वाल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.