दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आई-वडिलांवर हल्ल्याचा आरोप; भोसरीत मुलाला अटक
भोसरीतील श्रीरामनगर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. राहुल प्रल्हाद तळोले याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री साधारण ९ वाजता श्रीरामनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ही घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणी राहुल प्रल्हाद तळोले (वय ४५, रा. भोसरी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ६३ वर्षांच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल तळोले हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. घटनेच्या रात्री त्याने वडील प्रल्हाद तळोले यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांच्या छातीवर लाथ मारली. एवढ्यावरच तो थांबला नाही. तो थेट स्वयंपाकघरात गेला, तिथून धारदार चाकू घेऊन आला आणि वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
हे भांडण सोडवण्यासाठी आई मध्ये पडल्या. त्या वेळी चाकूचा वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर आरोपीने आईच्या पोटात लाथ मारून त्यांना ढकलून दिले, असेही पोलिसांनी सांगितले.
तरीही वडिलांना वाचवण्यासाठी आई पुन्हा त्यांच्याकडे धावून गेल्या. तेव्हा आरोपीने वडिलांच्या डाव्या डोळ्यावर बुक्कीने जोरदार प्रहार केला आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात आले.
या सगळ्या प्रकारानंतर जखमी अवस्थेतही आईने धाडस करून भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राहुल तळोले याला अटक केली. जखमी झालेल्या या दाम्पत्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भोसरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.