बॅग तपासली आणि सहा गुन्ह्यांची उकल; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई, तीन लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले असून, चौकशीत दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेत घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळले. या दोघांच्या चौकशीतून दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरी, असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
विकास ऊर्फ जंगल्या मिलिंद कांबळे (वय ३५, रा. पिंपरी) आणि गौतम धर्मलिंगम नाडार (वय २८, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना आता काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गस्त घालत होते. त्या वेळी भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ दोघे संशयास्पदरीत्या आढळले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील बॅग पंचांसमक्ष तपासली.
बॅगेत मोठे स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, छन्नी आणि करवत असे घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य मिळाले. त्यानंतर दोघांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी काही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात काळेवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक घरफोडी आहे. तसेच चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन दुचाकी चोरीचे गुन्हेही त्यात आहेत.
या सहा गुन्ह्यांतील मुद्देमाल आणि दुचाकी मिळून एकूण तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघे संशयित असल्याने त्यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, तसेच पोलिस अंमलदार विजय शेळकंदे, मनोज राठोड, अजय डगले, उद्धव खेडकर, संदेश देशमुख, विजय जानराव आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.