ऊसदरावरून साताऱ्यात राजू शेळके आक्रमक, दिवाळीनंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
४२०० रुपये प्रतिटन दराबाबत सहमती झाल्याचा संघटनेचा दावा आहे. तरीही सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र बैठक झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिवाळीनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा तापला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी कारखानदार आणि लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिला आहे. ठरलेला दर दिला नाही, तर दिवाळीनंतर तीव्र संघर्ष करू, असे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका आणि नागठाणे येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तब्बल ६२ तास रोखून धरल्याने प्रशासनाचे लक्ष या आंदोलनाकडे गेले. त्यानंतर प्रतिटन ४२०० रुपये ऊसदर देण्याबाबत सकारात्मक सहमती झाल्याचा संघटनेचा दावा आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हा दर दिला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
आता मात्र सातारा जिल्ह्यातील दर ठरवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अतुल भोसले, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि बँक संचालक या बैठकीला हजर होते. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अंतिम दर जाहीर केल्यावर सातारा जिल्ह्यातील कारखान्यांच्या संचालक मंडळांच्या बैठका घेऊन अंतिम दर जाहीर करण्याबाबत चर्चा झाली.
उसाची रिकव्हरी लक्षात घेऊन ११ ते १२ टक्के आणि १२ टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी असे दोन झोन करावेत आणि त्यानुसार दर ठरवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. उपस्थितांनी या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. पण आंदोलनातून मिळालेल्या ४२०० रुपयांच्या दराबाबत आता वेगळी भूमिका घेतली जात आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांशी संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न केवळ आर्थिक न राहता राजकीय प्रतिष्ठेचा झाला आहे. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे नेते कारखान्यांच्या प्रश्नावर एकत्र येतात, मग शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठी ते का एकत्र येत नाहीत, असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. दराच्या निर्णयासाठी त्यांना वारंवार आंदोलन करावे लागते. त्यामुळे नुसती सकारात्मक चर्चेची आश्वासने नकोत, ठरलेला दर प्रत्यक्षात द्या, अशी मागणी जोर धरत आहे.
राजू शेळके म्हणाले, "शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका. २०२९ मध्ये जनता सुद्धा बैठक घेऊन कोणाला मतदान करायचे, हे ठरवणार आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका तसेच नागठाणे येथे आम्ही शंभर टक्के यशस्वी आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ४२०० रुपये दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांत हा दर दिला जाणार असल्याची ग्वाही आम्हाला देण्यात आली होती. कोल्हापुरात ठरलेला दर सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही मान्य केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते."
ते पुढे म्हणाले, "आता जर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बैठक घेऊन आम्ही ऊसदर ठरवणार असल्याचे सांगत असतील, तर दिवाळीनंतर आम्ही कारखानदारांना अद्दल घडवू. रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ आली तर त्यासाठीही आमची तयारी आहे. दिवाळीनंतरचा संघर्ष साखर कारखानदारांना परवडणारा नसेल. उसाला ठरलेला दर दिला नाही, तर साखर सम्राटांची मस्ती कशी उतरवायची हे वेळ आल्यावर दाखवून देऊ. त्यामुळे कारखानदारांनी शहाणपणाने वागावे आणि आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये. बळीराजाच्या हक्कासाठी कोणताही संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत."
निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाने मते मागायची आणि त्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आला की निर्णय पुढे ढकलायचे, हे यापुढे सहन केले जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून दिला जात आहे. ऊसदराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुटला नाही, तर दिवाळीनंतर जिल्ह्यात पुन्हा आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.