गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

उसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या, राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही ठिय्या

व्यवसाय PT24 व्यापार डेस्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिल्या उचलीची मागणी ४,५०० रुपयांवरून ४,२०० रुपयांवर आणली आहे. किणी टोल नाका आणि नागठाणे येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज, ५ नोव्हेंबर रोजी, तिसरा दिवस आहे. उसाच्या दराचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांचा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राज्यात सध्या विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या चेअरमन निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे ऊस दरावरून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अक्षरशः खोळंबली आहे.

सुरुवातीला उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र साखर कारखानदार ३,८०० रुपयांच्या पुढे जायला तयार नव्हते. त्यामुळे चर्चेची गाडी पुढे सरकत नव्हती.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी राजू शेट्टी यांनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. ४,५०० रुपयांवरून मागणी कमी करून त्यांनी ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची नवी मागणी जाहीर केली. कारखानदारांनीही अडेलतट्टू भूमिका सोडून शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

किणी टोल नाक्यावर झालेल्या सभेत शेट्टी यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. ऊस शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांच्या घरासमोर शिमगा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनामुळे किणी टोल नाका आणि नागठाणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साताऱ्यातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अवजड वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी रात्र महामार्गावरच जागून काढली. विशेष म्हणजे गावोगावच्या महिलांनी पुढाकार घेऊन आंदोलकांसाठी भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.

आता शेट्टी यांनी ४,२०० रुपयांचा प्रस्ताव दिल्यानंतर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातून तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#नागपूर#कारोबार#PT24#Business#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ