दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना आणि विकीकडून चाहत्यांना सरप्राईज, लेक विहानचा पहिला फोटो शेअर
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी दिवाळीच्या निमित्ताने मुलगा विहानचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी दिवाळीच्या खास मुहूर्तावर चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे. आपला लाडका मुलगा विहान याचा पहिला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, या फोटोत पहिल्यांदाच विहानचा चेहरा पाहायला मिळत आहे.
हा सुंदर कौटुंबिक फोटो दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. फोटोत कतरिना आणि विकी मुलाला जवळ घेऊन दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी खास कॅप्शन लिहिलं आहे: "आमची आतापर्यंतची सर्वात उजळ दिवाळी... सर्वांना प्रेम, प्रकाश आणि आनंदाच्या शुभेच्छा". या पोस्टमुळे चाहत्यांचा आनंद दुप्पट झाला आहे.
या फोटोतील तिघांचा पारंपरिक लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे. कतरिनाने पिवळ्या रंगाचा सुंदर सूट घातला आहे, तर विकी भरतकाम असलेल्या आयव्हरी रंगाच्या कुर्त्यात दिसतो. त्यांचा मुलगा विहाननेही आई-बाबांशी मॅचिंग करत आयव्हरी रंगाचा कुर्ता-पायजमा आणि पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे.
फोटो समोर येताच सोशल मीडियावर त्यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. अनेक चाहत्यांनी विहानच्या गोंडस रूपाचं कौतुक केलं. काही जणांनी तो अगदी कतरिनासारखा दिसतो असं म्हटलं, तर काहींना त्याच्यात विकीची झलक दिसली. अनन्या पांडे, शीतल ठाकूर, शिबानी दांडेकर, मलायका अरोरा आणि चित्रांगदा सिंग यांसारख्या कलाकारांनीही या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कतरिना आणि विकी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये आपल्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. जन्मानंतर काही महिन्यांनी, ७ जानेवारी रोजी, त्यांनी मुलाचं नाव विहान असल्याचं जाहीर केलं होतं.
मात्र आतापर्यंत या जोडप्याने मुलाचा चेहरा चाहत्यांपासून दूर ठेवला होता. तेव्हापासून चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर दिवाळीच्या निमित्ताने कतरिना आणि विकी यांनी विहानची पहिली झलक दाखवली, आणि त्यामुळे ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.