बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा' चित्रपटाचा ट्रेलर आला, २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

सत्यघटनेवरून प्रेरित 'कापूसकोंडा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले प्रमुख भूमिकेत आहेत.

सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा' चित्रपटाचा ट्रेलर आला, २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या आगामी 'कापूसकोंडा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आता ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 'अ फॅमिली डॉग फिल्म' अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. कौटुंबिक नातेसंबंध, माणसांच्या भावना आणि एका कुत्र्यामुळे घडणाऱ्या अनपेक्षित घटना यांची गुंफण चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट सत्यघटनेवरून प्रेरित आहे. एका निवृत्त कर्मचाऱ्याला भेट म्हणून कुत्रा मिळतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडू लागतात, अशी याची कथा आहे. विशेष म्हणजे, कुत्र्याला घाबरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात हा नवा सदस्य आल्यावर काय घडते, याची उत्सुकता ट्रेलरमुळे वाढली आहे.

या नव्या सदस्यामुळे कुटुंबात कोणते बदल होतात, नात्यांमध्ये कोणती वळणे येतात आणि नेमके कोणते कारस्थान घडते, हे चित्रपटातून उलगडणार आहे. 'फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?' असा प्रश्न विचारत ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

चित्रपटात सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत नव्या पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील यांच्याही भूमिका आहेत. अनुभवी कलाकार आणि नवे चेहरे यांचा संगम या चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी सांभाळली आहे. छायांकन सचिन पाटेकर यांचे आहे. गाण्यांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील यांचे आहे. अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांनी गाणी गायली आहेत, तर सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.

जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म यांच्या सहकार्याने सादर होत आहे. कथानकाची गरज लक्षात घेऊन चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे.

सत्यघटनेवरून प्रेरित कथा, कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत आणि एका कुत्र्याभोवती फिरणाऱ्या अनोख्या घटना यामुळे 'कापूसकोंडा'बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना मनोरंजनासोबत भावनिक अनुभवही मिळणार का, हे २३ ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ